पुणे :कसबा पोटनिवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक पक्षाकडून अपक्ष तसेच नाराज उमेदवारांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे. आम आदमी पार्टीचे किरण कद्रे यांनी कसबा पेठ विधानसभामधून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनतर आज पक्षाने पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय न घेतल्याने कद्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
आगामी निवडणुका लढवणार :आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्यातील शहरी, ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी सज्ज होत आहे असे आपच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील खोक्या-बोक्याच्या राजकारणाला सामान्य जनता कंटाळलेली आहे. मागच्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची संगीत खुर्ची राज्यातील जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितली आहे. कोणताही प्रस्थापित पक्ष कोणत्याही इतर प्रस्थापित पक्षासोबत सत्ता स्थापन करू शकतो असा आरोत मेनन यांनी केला आहे.
आमदारांनी खोके घेतल्याचा आरोप : या प्रस्तापीत पक्षांना कोणतीही वैचारिक भूमिका नाही, हे राज्यातील जनतेला हे कळून चुकले आहे. आमदारांनी राजकीय पक्ष बदलण्यासाठी अथवा सत्तेत भागीदार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे घेतल्याच्या चर्चा जनसामान्यांमध्ये दररोज घडत आहेत. लोक या प्रकाराला कंटाळले आहेत असे प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले.