पुणे - विद्यार्थ्यांनी नियमित आणि भरपेट पाणी प्यावे यासाठी पुण्यातील एरंडवणे भागातील एका माध्यमिक विद्यालयात अनोखा वॉटर बेल उपक्रम राबविला जात आहे. केरळ राज्यातल्या शाळांमध्ये असा उपक्रम राबविला जात आहे. त्याच धर्तीवर पुण्यातील या शाळेत सदर उपक्रम सुरू करण्यात आला. मानवी शरीरात 70 टक्के पाणी असते, हा विचार करून आणि विद्यार्थ्यांच्या शरीरात न जाणाऱ्या पाण्याचे महत्व ओळखून एरंडवणे येथील शाळेत हा वॉटर बेल उपक्रम राबविला जात आहे. या शाळेत नियमित वेळेपेक्षा २ वेळा जास्त बेल वाजवली जाते. ही बेल वाजताच विद्यार्थ्यांना २ मिनिटे विश्रांती दिली जाते. या वेळेत सर्व विद्यार्थी एकाच वेळी आपल्या बॅगेतील पाण्याची बॉटल काढून पाणी पितात. अशाप्रकारचा उपक्रम राबविणारी पुण्यातील ही पहिलीच शाळा आहे.
या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना शिक्षक प्रकाश शेलार म्हणाले, केरळमधील एका शाळेत वॉटर बेल प्रकल्प सुरू असल्याची माहिती सोशल मीडियावर आलेल्या एका व्हिडिओद्वारे कळली. तो व्हिडीओ आगळावेगळा आणि खूप इंटरेस्टिंग होता, आपल्या शाळेतही हा उपक्रम राबवता येईल असा विचार मनात आला. त्यानंतर सर्व शिक्षकांचा सल्ला घेऊन आम्ही हा उपक्रम सुरू केला. आम्ही विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व पटवून दिले, त्यानंतर त्यांना वॉटर बेल विषयी सांगितले. सुरुवातीच्या काही दिवसात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होता. परंतु आजघडीला शाळेतील 300 हुन अधिक विद्यार्थी पाणी भरून बॉटल आणतात.
हेही वाचा - आईपासून दुरावलेले बछडे पुन्हा आईच्या कुशीत