पुणे- चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नी, मुलगा आणि मेहुण्यावर चाकूने वार केले. तसेच स्वतः वरही वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील लोणी काळभोर येथे गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हा चाकू हल्ल्यात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
घटनेबद्दल माहिती सांगताना पोलीस अधिकारी आयुष्य योगश बसेरे (वय ६) असे मृताचे नाव आहे, तर हल्लेखोर योगेश बसेरे (वय ३५), पत्नी गौरी उर्फ किरण बसेरे (वय २६) आणि मेहुणा भारत उत्तम शिरोळे हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तिघांवरही ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्लेखोर योगेश हा पत्नी गौरीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यावरून त्यांच्यात सातत्याने भांडण होत होते. त्यामुळे गौरी भाऊ भारत शिरोळे यांच्या घरी राहायला आली होती. दरम्यान गुरुवारी रात्री योगेश मेहुण्याच्या घरी पत्नीला भेटण्यासाठी आला. दोघेही बराच वेळ बोलत होते. त्यांच्यात परत एकदा वाद झाला. हल्लेखोर योगेशने रागाच्या भरात पत्नी गौरी आणि जवळच बसलेल्या आयुष यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. दरम्यान आरडाओरडा ऐकून भारत शिरोळे आत आले असता त्यांच्यावरही चाकूने वार केले. त्यानंतर त्याने स्वतःवरही वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
घरात सुरू असलेला गोंधळ पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चौघांनाही ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, आयुषचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर इतर जखमींवर उपचार सुरू आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.