पुणे - आळंदीमध्ये इंद्रायणी नदीवर विषारी फेस आढळला आहे. नदीपात्रातील पाणी दुषित झाल्याने हा फेस आला असल्याचे सांगितले जात आहे. फेस आढळत असलेल्या भागामध्ये दुर्गंधी देखील वाढली आहे. काही कंपन्यांमधून निघणारे पाणी इंद्रायणी नदीत येत असल्याने प्रदूषण वाढले आहे.
कंपन्यांची गटार लाईन नदीत -आळंदीमधून इंद्रायणी नदी वाहते. या नदीत आज विषारी फेसाचा थर नागरिकांना आढळून आला आहे. सिद्धेश्वर घाटाजवळील स्थानिक रहिवासी आणि भाविकांचे म्हणणे आहे की, हा प्रश्न गेल्या 10 वर्षांपासून सुरू आहे आणि गेल्या 4 वर्षात तो जास्त गंभीर बनला आहे, तसेच याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याचेही तेथील नागरिकांनी सांगितले आहे.
परिस्थिती गंभीर - मी गेल्या ४ वर्षांपासून येथे राहत आहे. परंतु, ही परिस्थिती 10 वर्षांपासूनची कायम आहे. गेल्या 4-5 वर्षांत ती आणखीनच गंभीर झाली आहे. कंपन्यांच्या गटर लाइन नदीत सोडतात. त्यामुळे या भागातील कचरा इंद्रायणी नदीत साचला जात आहे. त्यामुळे नदीची ही स्थिती झाली असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक दत्ता लिंगुरे यांनी दिली आहे. त्यामुळे या बाहीकडे गांभीर्याने घेण्याचे आवाहन नागरिकांनी प्रशासनाला केले आहे.
आरोग्याला धोका निर्माण - इंद्रायणी नदीत अनेक भाविक स्नान करतात. या नदीत रसायनयुक्त पाणी साडले जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. शासनाने या नदीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि या प्रदुषणावर तोडगा काढण्याचीही गरज असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.
कारवाईची मागणी - इंद्रायणी नदीजवळ रहिवासी भाग आहे. या पाण्यामुळे शेतीचेदेखील नुकसान होत आहे. येथील अनेक नागरिक याच नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी तसेच शेतीसाठी करतात. त्यामुळे शेतीचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे. या नदीत प्रक्रिया न करता पाणी सोडले जाते. त्यामुळे कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.