पुणे- गड किल्ल्यांचे संवर्धन आणि रक्षण करण्याचा संदेश घेऊन समुद्र सपाटीपासून 3 हजार फूट उंच लिंगाणा सुळका अवघ्या 4 वर्षीय चिमुकलीने सर केला आहे. सह्याद्री महेश भूजबळ, असे या चिमुकलीचे नाव असून तिने ही कामगिरी नविन वर्षात केली आहे. लिंगाणा हा चढाईसाठी अत्यंत अवघड आहे. खाली पाहिल्यानंतर केवळ मृत्यू दिसतो. असा अवघड आणि तितकाच आव्हानात्मक लिंगाणा सुळका सह्याद्रीने सर केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वयाच्या 11 महिन्यापासून सह्याद्रीला गड किल्ले याबाबद्दल माहिती देत संवर्धन करण्याची शिकवण वडील महेश भूजबळ यांनी दिली. रायगड, सिंहगड, दिवे घाट येथील मल्हार गड, तुंग, प्रतापगड अशा प्रकारचे एकूण 13 गडकिल्ले सह्याद्रीने भटकंती केली आहे. त्यामुळे तिच्या आत्मविश्वासात आणखीनच भर पडत गेली.
गड किल्ल्यांचे संवर्धन आणि रक्षण याचा संदेश देण्यासाठी तिने लिंगाणा सुळका सर करण्याचे ठरवले असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. मुळाक्षरे गिरवण्याच्या वयात सह्याद्रीने लिंगाणा सुळका सर करण्याचे स्वप्न पाहिले होते. यासाठी खडतर परिश्रम घेत सागर नलावडे आणि तिचे वडील महेश भूजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगाणा सुळका सर करण्याची तयारी करण्यात आली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजणाच्या सुमारास रोपच्या साहाय्याने सुळका सर करण्यास सुरुवात केली. सुरक्षेविषयी सर्व साधने घेऊन ही पाऊले उचलण्यात आली होती.