पुणे -कॅम्प परिसरात असलेल्या 'फॅशन स्ट्रीट'ला शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली. ही आग विझवून घरी जाणारे अग्निशामक दलाचे अधिकारी प्रकाश हसबे यांच्यावर काळाने घाला घातला. बसने दिलेल्या धडकेत हसबे यांचा मृत्यू झाला. पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाचे ते प्रमुख होते.
आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त
शुक्रवारी रात्री 'फॅशन स्ट्रीट'वरील कपड्यांच्या मार्केटला आग लागली. या परिसरात मोठ्या प्रमाणात कपड्यांची दुकाने असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. आग लागल्याची माहिती मिळताच पुणे महानगरपालिका आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहचले. कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट हा भाग अत्यंत दाटीवाटीचा परिसर आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना मोठी शिकस्त करावी लागली. प्रकाश हसबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन ते चार तासात ही आग आटोक्यात आणली.
भरधाव बसने दिली जोरदार धडक
फॅशन स्ट्रीटला लागलेली आग आटोक्यात आणल्यानंतर प्रकाश हसबे घरी निघाले होते. घरी जात असताना येरवाड्याजवळ एका बसने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. आगीच्या ठिकाणी संपूर्ण बचावकार्यात पुढे होऊन त्यांनी सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. आगीतून अनेकांना सुखरूप वाचवून आपल्या घराकडे निघालेल्या हसबेंच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
'फॅशन स्ट्रीट'च्या आगीत 500 पेक्षा जास्त दुकाने खाक
कॅम्प परिसरातील 'फॅशन स्ट्रीट'ला शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत 500पेक्षा जास्त दुकाने जळून खाक झाली आहेत. कॅम्प परिसरातील हा फॅशन स्ट्रीट पुणेकरांचे खरेदीसाठी आवडते ठिकाण आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास या मार्केटमध्ये अचानक आग लागली. या भागात मोठ्या प्रमाणात कपड्यांची दुकाने असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. एक-एक करत शेकडो दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहचले. 16 बंबाच्या मदतीने 4 ते 5 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आगीचे नेमके कारण अस्पष्ट
या मार्केटमध्ये अचानक आग कशी लागली यावर चर्चा सुरू आहे. या भागात मोठ्या प्रमाणात कपड्यांची दुकाने आहेत. मात्र, हॉटेल किंवा खाद्यपदार्थ बनवण्याची दुकने नाहीत त्यामुळे ज्वलनशील वस्तू असण्याची शक्यता कमी होती, असे काही व्यवसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आग लागण्याचे नेमके स्पष्ट कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
लाखो रुपयांचे नुकसान
गेल्या काही काळापासून कॅम्प परिसरातील हे मार्केट इतरत्र हलवण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, येथील दुकानदारांचा याला विरोध आहे. त्यामुळे काल लागलेल्या आगीबाबत व्यावसायिक शंका उपस्थित करत आहेत. इतर वेळी रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे मार्केट, सध्या कोरोना संसर्गामुळे लवकर बंद होते. शुक्रवारी देखील रात्री साडे नऊ वाजता दुकाने बंद करून व्यावसायिक घरी गेले होते. मात्र, काही वेळातच मार्केटला आग लागल्याची बातमी आली. याआगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मार्केटचे फायर ऑडिट झाले होते का? दुकानांमध्ये आगीवर नियंत्रण मिळणाऱ्या व्यवस्था होत्या का? यासह अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.