पुणे- निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसे दिले नाहीत. तसेच वारंवार बी.एम.डब्ल्यू कारची मागणी करत सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या भाजप नगसेविकेसह पीडितेचा पती, दीर आणि अन्य एकावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २७ वर्षीय विवाहित महिलेने सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे.
पीडितेच्या सासू भाजप नगरसेविका आरती सुरेश चौधे, पती संकेत सुरेश चौधे, दीर विनय सुरेश चौधे, सासूचा भाऊ किशोर निम्हण अशी आरोपींची नावे आहेत. दीर विनय सुरेश चौधे याने महिलेचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016 पासून 27 वर्षीय तक्रारदार महिलेचा शारिरीक आणि मानसिक छळ होत आहे. माहेरहून बी.एम.डब्ल्यू. कार घेऊन ये, अशी मागणी करत निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून महिलेचा वारंवार छळ केला जात होता. तसेच घरात राहण्याच्या लायकीची नाहीस, असे म्हणत महिलेचा वेळोवेळी अपमान केला जात होता.
पीडितेचा दीर विनय याने घरामध्ये कोणी नसताना त्यांच्या अंगाला स्पर्श करून विनयभंग केला. दरम्यान, पीडितेने यास विरोध केला असता त्यांना शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपी यांनी मानसिक शारीरिक त्रास देऊन छळ केल्या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात संबंधित पिडीत विवाहित महिलेने तक्रार दिली आहे. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.
हेही वाचा - पिसाळलेला कुत्रा चावल्याने महिलेचा मृत्यू