पुणे -सध्या सोशल मीडियावर एक आजी मर्दानी खेळ दाखवून मदत मागत असल्याचा व्हिडियो व्हायरल होत आहे. सामान्य नेटकऱ्यांपासून ते रितेश देशमुख सारख्या बॉलिवूड कलाकारांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतील आजीबाई कोण आहेत हे जाणून घेतले आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी...
हडपसरमधील गोसावीवस्ती येथे राहणाऱ्या शांताबाई पवार या वयाच्या 85व्या वर्षीही मुलांच्या आणि नातवंडांच्या उदरनिर्वाहसाठी डोंबारी खेळातील कसरती दाखवत आहेत. पतीच्या अकाली निधनानंतर शांताबाई यांच्यावर संकट कोसळले. सहा मुलांची व त्यांच्याबरोबर नातवंडांच्या उदरनिर्वाहाचीही जबाबदारी त्यांच्यावर पडली. संसाराचा गाडा ओढण्यासाठी त्यांनी जिद्दीने रस्त्यांवर साहसी खेळ सादर करायला सुरुवात केली. या वयातही काम करून शांताबाई आपल्या बरोबर आपल्या दहा अनाथ मुलांना मोठ्या हिंमतीने सांभाळत आहेत. त्यांच्या कुटुंबात लहान-मोठ्यासह 20 पेक्षा जास्त सदस्य आहेत.