पुणे - दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरांना चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून आठ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई चिंचवड पोलिसांनी केली आहे. अंकुश बालाजी क्षीरसागर आणि प्रदीप संजय माळी दोन्ही (रा. कस्पटे वस्ती, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दोन चोरांकडून आठ दुचाकी जप्त; चिंचवड पोलिसांची कामगिरी वाहतूक पोलीस मारुती फलके हे चिंचवडमध्ये वाहतूक नियम करत होते. तेव्हा, आरोपी अंकुश हा एका चोरीच्या दुचाकीवरून येत होता. त्यावेळी त्याला वाहतूक पोलिसांनी बाजूला घेऊन कागदपत्रांची मागणी केली असता गाडी मित्राच्या नावावर असल्याचे सांगून कागदपत्रे घेऊन येतो म्हणून त्याने धूम ठोकली. तो न आल्याने अखेर चिंचवड पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, दुचाकीच्या पेट्रोल कव्हरमधून आरोपी अंकुशचे काही कागदपत्रे मिळाली. त्यानुसार चिंचवड पोलिसांनी त्याला शोधून ताब्यात घेतले. यानंतर चौकशीत त्याच्या अन्य एका मित्राचेही नाव समोर आले. यावेळी त्याने संबंधित दुचाकी ही चोरीची असून पिंपरी-चिंचवड परिसरातून चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रदीपला देखील ताब्यात घेऊन चौकशी केली.
दोघांनी चिंचवड, भोसरी, हिंजवडी परिसरातून आठ दुचाकी चोरल्याचे कबूल केले. दोघांकडून दोन लाख पन्नास हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, गुन्हे पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांच्या पथकाने केली आहे.