पुणे -लोणावळा शहरातील प्रसिद्ध हॉटेल कुमार रिसॉर्टवर, लोणावळा पोलिसांनी छापा टाकत 72 जणांना जुगार खेळत असताना पकडले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील बहुतांश व्यापारी आहेत. या कारवाईत पोलिसांनी 44 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, हॉटेल कुमार रिसॉर्टचे मालक आणि मॅनेजर यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये 3 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम, 6 हजार 343 रुपयांची दारू, खेळासाठी वापरण्यात येणारे 1000 रुपये किंमतीचे 36 लाख 60 हजार रुपयांचे टोकन व 500 रुपये किंमतीचे 4 लाख 75 हजार रुपयांचे टोकन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 44 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा शहरातील हॉटेल कुमार रिसॉर्टवर काही व्यापारी, महिला जुगार खेळत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना मिळाली. त्यानुसार स्टाफला सोबत घेऊन स्वतः नवनीत कावत यांनी हॉटेलवर छापा टाकला. यात गुजरात येथील 60 व्यापार्यांसह सर्व्हिस प्रोव्हाईड करणार्या 12 महिला तसेच कुमार रिसाॅर्टचे मालक धिरजलाल कुमार ऐलानी, कुमार रिसाॅर्टच्या व्यवस्थापक अन्वर शेख, जुगारीचे नियोजन करणारा झिशान इरफान ईलेक्ट्रिकवाला यांच्यावर जुगार प्रतिबंध अधिनियम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.