पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. तीन दिवसांपूर्वी भोसरीमध्ये टोळक्याने धुडगूस घालत आठ वाहनांची तोडफोड केली होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तसेच पोलीस आरोपींचा शोध घेत होते.
वाहनांची मोडतोड करतानाची दृश्य... अभिषेक युवराज कांबळे (वय - २० ), अनिकेत श्रीधर कोपरे (वय - १९ ), अमोल कैलास ढेंगळे ( वय - १९ ), अक्षय राजेंद्र पवार ( वय - १९ ) , सूरज नारायण शर्मा ( वय - १९ ), अमोल शांताराम नीतोने ( वय - १९ ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीच्या दिघी रोड परिसरात अज्ञात टोळक्याने दहशत पसरवत आठ वाहनांची तोडफोड केली होती. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या सीसीटीव्ही फुटेजवरून भोसरी पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली या तपासाला सुरुवात झाली.
तेव्हा, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलासे यांच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी समीर रासकर आणि सुमित देवकर यांनी ६ आरोपींना अटक केली. दरम्यान, आरोपींनी वाहनाची तोडफोड केली असल्याची कबुली दिली आहे.