पुणे - देशावर कोरोनाचे संकट असताना महाराष्ट्रात निसर्ग चक्रीवादळ घोंगावत आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. काही ठिकाणी इमारतींवरील पत्रे उडाले आहेत, तर विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. तर वहागाव येथील दोन घरांवरील छत नागरिकांच्या अंगावर पडून 5 जण जण जखमी झाले आहेत. जखमींवर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वहागाव गावात दुपारच्या सुमारास नवले कुटुंबातील सर्व नागरिक घरात बसले होते. त्यावेळी अचानक पावसाचा जोर वाढून चक्रीवादळ सुरु झाले. या वादळाची तीव्रता वाढल्याने तानाजी नवले व नारायण नवले यांनी नवीन बांधलेले घर चक्रीवादळात पडले. त्यामुळे घरातील लोक गंभीर जखमी झाले आहेत. घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरातील वस्तू धान्यही पावसात भिजून खराब झाले आहे.