पुणे - मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट होत असताना शेतात आश्रय घेणाऱ्या बिबट्याच्या पाच बछड्यांना जीव गमवावा लागला आहे. उसात पाचटाला लावलेल्या आगीत बिबट्याच्या पाच बछड्यांचा जळून मृत्यू झाला आहे. प्राणीप्रेमींना चटका लावणारी ही घटना पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे घडली आहे. मादी बिबट्या आक्रमक होण्याची भीतीने परिसरातील ग्रामस्थ सतर्क झाले आहेत.
ऊसाचे पाचट पेटवल्याने बिबट्यांच्या पाच बछड्यांचा होरपळून मृत्यू
बछड्यांचा मृत्यू झाल्याने या परिसरात असणारी बिबट्या मादी आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात नागरिकांना पुढील काळात सतर्क राहावे लागणार आहे.
सध्या खेड-आंबेगाव- जुन्नर शिरुर परिसरात ऊस तोडणी अंतिम टप्प्यात आली आहे. अवसरी बुद्रुक येथील गोपीनाथ सखाराम गुंणगे यांच्या शेतात आज सकाळी ऊसतोड कामगार ऊस तोडणीसाठी आले. तोडणी झाल्याने उसाच्या शेतातील पाचटाला आग लावण्यात आली.हे ऊसाचे पाचट जळत असताना बिबट्या मादीची पाच पिल्ले दडून बसली होती. काहीच वेळात आगीचे रौद्ररूप झाल्याने या बिबट्यांच्या पिल्लांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. बछड्यांचा मृत्यू झाल्याने या परिसरात असणारी बिबट्या मादी आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात नागरिकांना पुढील काळात सतर्क राहावे लागणार आहे.
बिबट्यांची बछडे उसात कशी आली असावी?
ऊस शेतीला जंगल समजून बिबट्याने तिथे वास्तव्य केले असावे, असा ग्रामस्थ अंदाज करत आहेत. त्यामुळे बिबट्याच्या अधिवासाचा व बछड्यांच्या संगोपनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा घटना घडून नये, यासाठी वनविभाग काय पावले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.