पुणे - पुण्यामध्ये आढळलेल्या ५ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यातल्या नायडू रुग्णालयात एकूण १७ रुग्ण निरीक्षणाखाली असून यातल्या ५ जणांना कोरोणाची बाधा झाली आहे. तर, इतर १२ रुग्णांना संशयित म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्या सर्व रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
संशयित रुग्णांचे सॅम्पल निरीक्षणासाठी पाठवणयात आले असून त्याचा रिपोर्ट बुधवारी सायंकाळपर्यंत हाती येणार आहे. दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयांबाबत काय निर्णय घ्यायचा हे मुख्यमंत्र्यांना कळवले आहे. त्यांच्याकडून जो निर्णय घेईल तो पाळला जाईल. मात्र, अद्याप शाळा किंवा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय झालेला नाही. पुढील परिस्थिती पाहून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे देखील विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात कोण-कोण आले आहे, याचा कंटेंट प्लॅन सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने २८ ऍक्शन पॉईंटप्रमाणे जिल्ह्याभरात काम सुरू केले असल्याचे देखील विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले. नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. दर ४ तासांनी केवळ साबणाने हात धुतला तरी चालणार असून कमीत कमी वीस सेकंद हात धुतले पाहिजे. तसेच कोरोना व्हायरस हा थुंकीच्या थेंबाद्वारे पसरत असल्याने त्याच्याशी संपर्क आल्याशिवाय कोरोनाची लागण होत नाही. त्यामुळे कुठल्याही वस्तूला हात लावल्यानंतर नाक, डोळे, तोंडाला स्पर्श करू नका या नियमांचे पालन नागरिकांनी करावे असे विभागीय आयुक्त यावेळी म्हणाले.