महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे दुर्घटना : मृतांच्या नातलगांना राज्य सरकारकडून ५ लाख, तर एनडीआरएफकडून ४ लाखांची मदत जाहीर

कोंढव्यात कांचन कम्फर्ट इमारतीच्या विकासकाने मजुरांसाठी पत्र्याच्या खोल्या बांधल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास या खोल्यांवर शेजारच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली.

कोंढवा दुर्घटना

By

Published : Jun 29, 2019, 12:27 PM IST

Updated : Jun 29, 2019, 1:22 PM IST

पुणे - कोंढवा येथील भिंत दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांची, तर राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतून ४ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतून ही मदत करण्यात येणार आहे. मात्र, यामध्ये मृतांचे नातेवाईकही दगावले आहेत. अशा परिस्थितीत मदत द्यायची कुणाला? असा प्रश्न सरकारसमोर आहे.

दुर्घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आयुक्त सौरभ राव आणि कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे

कोंढव्यात कांचन कम्फर्ट इमारतीच्या विकासकाने मजुरांसाठी पत्र्याच्या खोल्या बांधल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास या खोल्यांवर शेजारच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. भिंत मोठी असून कामगारांच्या खोल्या खड्ड्यात असल्याने मोठ्या प्रमाणात भिंतीचा मलबा पडला आहे. यावेळी मजूर झोपेत असल्याने भिंतीच्या मलब्याखाली दबले. यामध्ये १५ कामगारांचा मृत्यू झाला. तर ३ कामगारांना जीवंत बाहेर काढण्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांना यश आले आहे.

इमारतीची सुरक्षा भिंत एवढी उंच असताना त्याच्या बाजूलाच कामगारांचे कॅम्प लावू शकत नाही. मात्र, याठिकाणी असे कॅम्प लावण्यात आले. निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली असून चौकशीसाठी उच्चस्तरीय संयुक्त समिती नियुक्त करण्यात येत आहे. त्याद्वारे चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले. तसेच मुख्यमंत्री साहाय्यता निधीतूनदेखील मदत देण्यात आली आहे. मात्र, या दुर्घटनेमध्ये मृतांसोबत त्यांचे नातेवाईकही दगावले आहेत. मग मदत द्यायची कुणाला? असा प्रश्न असल्याचे शिवतारे म्हणाले. मात्र, त्यासंबंधी संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. त्यानुसार बिहारमध्ये त्यांचे नातेवाईक असल्यास त्यांना मदत देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्याप्रमाणे राज्य सरकारच्यावतीने मृतांच्या नातेवाईकांना लवकरच मदत उपलब्ध करून देणार असल्याचे कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले.

संयुक्त समितीत 'या' ५ तज्ज्ञांचा समावेश -
भिंत दुर्घटनेप्रकरणी चौकशी करण्यासाठी ५ जणांची तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी, पोलिस उपायुक्त, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, कामगार उपायुक्त आणि पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा समावेश असल्याचे पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव म्हणाले.

Last Updated : Jun 29, 2019, 1:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details