पुणे - व्हॉट्सअॅपवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच पहागात पडली आहे. मौल्यवान भेटवस्तू पार्सल पाठवल्याचे सांगून एका महिलेला तब्बल ३ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोन जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कल्पना नाईक (वय-४५) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांची शिवम पुजारी नावाच्या व्यक्तीसोबत व्हॉट्सअॅपवरून ओळख झाली. त्यानंतर त्याने मौल्यवान भेटवस्तू पार्सल करून पाठविल्याचे कल्पना यांना व्हॉट्सअॅवरूनच सांगितले. तसा मसेज देखील कल्पना यांना मिळाला. त्यानंतर संबंधित पार्सल दिल्ली एअरपोर्ट येथे आल्याचा फोन कस्टम अधिकारी म्हणून नेहा गुप्ता नावाच्या मुलीने केला. त्यामुळे कल्पना यांचा विश्वास बसला.
पार्सल पाहिजे असल्यास ३९ हजार ८०० रुपये भरावे लागतील, असे नेहाने त्यांना फोन करून सांगितले. त्यांनी कुठलाही विचार न करता ऑनलाईन पद्धतीने नेहाच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर पार्सल जास्त पैशांचे आहे, तुमच्यावर मनी लॉड्रींगची केस होऊ शकते, अशी भीती नेहाने दाखवली. त्यामुळे पुन्हा ४ ते ५ लाख रुपये भरावे लागणार असल्याचे नेहाने सांगितले. त्यावेळी भितीपोटी कल्पना यांनी तब्बल १ लाख १५ हजार रुपये भरले. मात्र, ही रक्कम कमी असून पुन्हा तुम्हाला पैसे भरावे लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कल्पना यांनी पुन्हा १ लाख ४० हजार रुपये भरले. मात्र, वारंवार पैशांची मागणी होत असल्याने फसवणूक झाल्याचे कल्पना यांच्या लक्षात आले.
कल्पना यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार कस्टम अधिकारी म्हणून सांगणारी नेहा गुप्ता आणि व्हॉट्सअॅपवर मेसेज करणारा शिवम पुजारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, दोन्ही आरोपी मोकाट असून त्यांचे बँक खाते नागालँड येथील असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अधिक तपास पिंपरी पोलीस आणि सायबर सेल करत आहे.
दरम्यान व्हाट्सअॅपवर अनोळखी व्यक्तीकडून येणारे मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.