पुणे - लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि काही नोकऱ्या वाचवण्यासाठी तारेवरची कसरत करत आहेत. मात्र आपली जबाबदारी ओळखून, या काळात पुण्यातील २४ वर्षीय तरुणीने, घरीच केक तयार करुन त्यांची विक्री केली. त्यातून तिने तब्बल एक लाखाची कमाई केली. प्रिया शिळसकर असे त्या तरूणीचे नाव आहे.
प्रियाने एमबीएचे शिक्षण घेतले असून ती नोकरी करत असे. पण तिच्यावर अंध आईची जबाबदारी होती. यामुळे तिने नोकरी सोडली आणि केक बनवण्याचा कोर्स पूर्ण केला. अशात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. या काळात अनेकांचे वाढदिवस होते. तेव्हा त्यांची केकची निकड ओळखून प्रियाने घरीच केक बनवण्याचा निर्णय घेतला. ती घरी केक बनवायची आणि केकची पार्सल डिलिव्हरी द्यायची.
प्रियाने या माध्यमातून आतापर्यंत २०० केकची विक्री केली आहे. यातून तिला १ लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले. आज प्रियाकडे बरेचसे फ्लेवर्सचे केक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ती एक किलोपासून दहा किलोपर्यंतचा केक बनवते. या कामात तिला तिची लहान बहिण मदत करते. तर वडिलांचाही यात मोठा हातभार असतो.