परभणी -औद्योगिक वसाहतीच्या परिसरात काम शोधण्यासाठी रस्त्याने जाणाऱ्या एका विवाहित महिलेला धावत्या चारचाकी वाहनात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने परभणीच्या नवामोंढा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन चारचाकीतील दोघांवर हा आरोप केला आहे.
परभणी : धावत्या वाहनात ओढून महिलेवर अत्याचार ही घटना बुधवारी दुपारी घडली असून या प्रकरणी नवामोंढा पोलिसांनी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला. पीडित महिलेची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. मात्र, अजूनही त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. तर या प्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेतले नसून, पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी दिली.
काम शोधत फिरत होती महिला
महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात ती बुधवारी दुपारी काम शोधत फिरत असताना एका चारचाकीतील व्यक्तीने तिला जबरदस्तीने वाहनात ओढून घेतले. यावेळी तिने आरडाओरड केला, विरोध केला. मात्र, वाहन चालकाने तिला चाकूचा धाक दाखवला. तसेच धमकावले. त्यानंतर वाहनातील अन्य व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला.
आरोपीच्या शोधासाठी पथक
पीडित महिला 27 वर्षीय असून तिने नवामोंढा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आरोपींचे वर्णन केले आहे. त्यानुसार पोलीस पथक तयार करण्यात आले असून, ते आरोपींचा शोध घेत आहेत. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच या घटनेमागे जुना काही इतिहास आहे, का याची देखील तपासणी पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा तपास महिला फौजदार भावसार या करत असून, लवकरच गुन्ह्याची उकल करून आरोपी पकडण्यात येईल असेही पोलीस निरीक्षक तट यांनी सांगितले.