परभणी- लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान पार पडले. मतमोजणी 23 मे रोजी होणार असून यासाठी परभणीच्या कृषी विद्यापीठात 84 टेबलांचे नियोजन करण्यात आले आहे. साधारणपणे 24 ते 29 फेऱ्यांमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. दरम्यान, परभणीत झालेल्या अटी-तटीच्या सामन्यामुळे येथील प्रत्येक मतदाराला मतदान मोजणीच्या दिवसाचे वेध लागले आहे.
तब्बल 19 लाखाहून अधिक मतदारसंख्या असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी 12 लाख 53 हजार 612 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सुमारे 63.19 टक्के मतदान झाले असून त्यांची मतमोजणी 23 मे रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे. या ठिकाणच्या स्ट्रॉंग रूममध्ये मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन आणि व्हिव्हीपॅट ठेवण्यात आले आहेत. महाविद्यालयाच्या संपूर्ण इमारतीला पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून याठिकाणी संबंधितांशिवाय एकही व्यक्ती फिरकणार नाही, याची काळजी पोलीस घेत आहेत. इमारतीची सुरक्षा राखीव पोलीस दल यांच्या हातात असून याठिकाणी पोलीस निरीक्षक आणि काही साहाय्यक पोलीस निरीक्षकांचे त्यांच्यावर नियंत्रण आहे.