परभणी- पाण्यासाठी आक्रमक झालेल्या महिलांनी आज (मंगळवारी) चक्क ग्रामसेवकाला डांबण्याचा प्रयत्न केला. मात्र, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्या मध्यस्थीमुळे ३ तासानंतर या ग्रामसेवकाची सुटका झाली. हा प्रकार गंगाखेड तालुक्यातील खंडाळी येथे घडला.
खंडाळी गावात पाणीटंचाई असल्याने पाण्याचा टँकर सुरू करण्याबाबत जानेवारीमध्ये ग्रामपंचायतीत ठराव घेण्यात आला. त्यांनतर पंचायत समितीकडे हा प्रस्ताव सादर करूनसुद्धा टँकर सुरू झाले नाही. किरकोळ त्रुटी दाखवून प्रस्ताव परत पाठविण्यात येत असल्याने महिला आणि ग्रामस्थ संतप्त झाले. यामुळे सकाळी गावात आलेले ग्रामसेवक एम. व्ही. नवटके यांना घेराव घालत जाब विचारला. टँकर सुरु करण्याच्या मागणीसाठी महिलांसह आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी या ग्रामसेवकाला समाज मंदिरात बसवून ठेवले. याबाबत ठोस आश्वासन मिळेपर्यंत बाहेर जावू देणार नाही, असा पवित्रा घेतला.