परभणी -गेल्या काही दिवसात इंधनाचे दर पुन्हा एकदा भडकले असून, त्यात परभणीतील उच्चांकी दरामुळे या ठिकाणचे वाहनधारक संताप व्यक्त करत आहेत. परभणीत पेट्रोल 102.57 पैसे प्रति लिटर एवढ्या दराने विक्री होत असून, डिझेल देखील शंभरीच्या दिशेने वाटचाल करत आहे. डिझेलचा दर 93.4 पैसे एवढा झाला. तर पावर पेट्रोल 105 रुपयांच्या पुढे विक्री होत आहे. दरम्यान, परभणीत गेल्या वर्षभरात पेट्रोल 24 रुपयांनी तर डिझेल 25 रुपयांनी महागले आहे.
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत परभणीने रेकॉर्ड कायम ठेवला आहे. राज्यातीलच नव्हे तर कदाचित देशातील सर्वात महाग पेट्रोल सध्या परभणीकारांना घ्यावे लागत आहे. 'जगात जर्मनी आणि भारतात परभणी' या म्हनी प्रमाणे पुन्हा एकदा परभणी इंधनाच्या रेकॉर्डब्रेक किंमतीमुळे चर्चेत आली आहे. परभणी शहरात आज शनिवारी पावर पेट्रोल तब्बल 105 रुपये 22 पैसे प्रति लिटर दराने विक्री होत आहे. तर साधे पेट्रोल 102.57 पैसे दराने विकल्या जात आहे. तसेच डिझेलच्या दराचा सुध्दा भडका उडाला असून, डिझेल 93.04 पैसे प्रतिलिटर प्रमाणे परभणीकर खरेदी करत असल्याने त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा -रत्नागिरीतील समुद्रात सापडला तब्बल १५० किलोचा मासा, बघण्यासाठी लोकांची गर्दी
वर्षभरात पेट्रोल 24 रुपयांनी महागले -
विशेष म्हणजे गतवर्षी मे महिन्यातच परभणीत पेट्रोलचे दर 78 रुपये 35 पैसे प्रति लिटर एवढे होते, तर 30 ऑक्टोंबर अर्थात सहा महिन्यापूर्वी 90 रुपये आणि तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच 30 जानेवारीला 95 रुपये 21 पैसे आणि 30 मार्च रोजी 99 रुपये 8 पैसे प्रति लिटर दराने विक्री झाले आहे. त्यानंतर मे महिन्यात हा दर शंभरी च्या वर गेला. त्यानुसार काल शुक्रवारी (28 मे रोजी) 102. 32 पैसे प्रति लिटर झाला, तर आज (शनिवारी) त्यात वाढ झाली असून, 102 रुपये 57 पैसे प्रति लिटर दराने पेट्रोल ग्राहकांना खरेदी करावे लागत आहे.
डिझेलमध्येही 25 रुपयांची वाढ -
पेट्रोल प्रमाणात डिझेल ही शंभरी च्या वाटेवर आहे. डिझेल मध्ये देखील गेल्या वर्षभरात तब्बल 25 रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी 7 मे रोजी परभणीत डिझेल 67 रुपये 17 पैसे तर सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच 30 ऑक्टोंबर रोजी 77 रुपये 80 पैसे एवढ्या दराने विक्री झाले. शिवाय तीन महिन्यापूर्वी म्हणजे 30 जानेवारी रोजी डिझेलचा दर 84 रुपये 3 पैसे तर 30 मार्च रोजी 88 रुपये 64 पैसे एवढा झाला होता. यात पुन्हा वाढ होऊन काल (शुक्रवारी) 92.75 पैसे एवढ्या दराने डिझेलची विक्री झाली, तर आज (शनिवारी) त्यात आणखी 29 पैशांची वाढ होऊन हाच दर 93 रुपये 4 पैसे एवढा झाला आहे.