परभणी- दिल्ली येथील निजामुद्दीन भागात तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या परभणी शहरातील 3 व्यक्तींचा 'कोरोना' विषाणुच्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्या जिल्ह्यातील 5 ठिकाणच्या 5 व्यक्तींना त्यांच्या घरी होम-क्वारंटाईन करून त्यांचेही 'स्वॅब' नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आज रात्री किंवा उद्या सकाळी प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी माध्यमांना दिली आहे.
कोरोनाने संपूर्ण जगात दहशत निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्यामुळे चिंता अधिक प्रमाणात आहे. असे असले तरी परभणीत मात्र अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण सापडलेला नाही. परंतु दिल्ली येथील निजामुद्दीन भागात तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींना मोठ्या संख्येने कोरोनाची लागण झाल्याची बाब पुढे आल्याने देशात खळबळ उडाली. विशेष म्हणजे परभणी शहरातील 3 जण या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे निष्पन्न झाले. ते तिघे परभणीत 13 मार्च रोजी आले होते. त्या व्यक्तींना परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, त्यांच्या घरून ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. मंगळवारीच त्यांच्या घशातील 'स्वॅब'चे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. ते पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज (गुरुवारी) सकाळीच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. या तिघांच्याही तपासण्या निगेटिव्ह असून कोणालाही कोरोना झाला नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती मुगळीकर यांनी दिली.