परभणी- लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान प्रकिया पार पडली होती. गुरुवारी २३ मे ला मतमोजणी होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. २८ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे ३५० कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिली आहे.
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पी. शिवाशंकर म्हणाले, परभणी लोकसभेसाठी १८ एप्रिल रोजी मतदान झाले. यावेळी ६३.१९ टक्के मतदान झाले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी, परतूर व घनसावंगी विधानसभा मतदार संघातील मतमोजणी स्वतंत्र ६ खोल्यांमध्ये केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक खोलीत १४ टेबलांवर प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांच्या मार्फत मतमोजणी केली जाणार आहे.
मतदार संघातील एकूण २ हजार १७४ मतदान केंद्रावरील मतमोजणी ही २२ ते २९ फेऱ्यांमध्ये केली जाणार आहे. ईव्हीएम मशीनची मोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदार क्षेत्रातून ड्रॉ पद्धतीने निवडलेल्या प्रत्येकी ५ केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या पेपर स्लिपची मोजणी एका टेबलावर करण्यात येणार आहे. याशिवाय पोस्टल बॅलेटच्या आधारे झालेले मतदान निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कक्षात ४ टेबलांवर होणार आहे.