परभणी - संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापन आणि सेवांवर बंदी आहे. गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ तर यापूर्वी शासनाने बंद केले आहेत. असे असली तरी मोठ्या प्रमाणात दारू, गुटखा आणि तंबाखूचे छुप्या मार्गाने वाहतूक सुरुच आहे. आज जिंतूर पोलिसांनी एक टेम्पो पकडून त्यातील साडेतीन लाख रुपयांचा तंबाखू जप्त केला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई जिंतूर-औंढा या राज्य महामार्गावर आडगाव फाट्याजवळ करण्यात आली. एका टेम्पोतून (एम.एच.19 झेड 5900) सूर्यछाप तोटा तंबाखूची वाहतुक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जिंतूर पोलिसांनी या ठिकाणी आज दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी नाकाबंदी दरम्यान या टेम्पोची तपासणी केली असता त्यात सूर्यछाप तोट्याचे 150 बॉक्स सापडले. त्याची किंमत 3 लाख 45 हजार एवढी आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदीसुरू आहे. तरिही अनेक ठिकाणी दुकानांमध्ये गुटखा आणि तंबाखूची विक्री आहे. या छोट्या व्यवसायिकांना तंबाखू पुरविण्याचे काम काही गुटखा माफियांकडून बिनधास्त होत आहे. त्यानुसार तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकास पोलिसांनी अडवून तो टेम्पो जिंतूर पोलिस ठाण्यात आणून उभा केला. टेम्पो चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सूर्यछाप नामक जर्दाचे 150 बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहे. त्यांची किंमत 3 लाख 45 हजार व वाहनाची 6 लाख रूपये किंमत आहे. टेम्पो चालक शेख शकुर शेख कासम (वय 52 वर्षे, रा.चाळीसगाव, जि.जळगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख अहेमद शेख लाल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा -परभणी जिल्ह्यात 10 मेपर्यंत 'जैसे थे'; अत्यावश्यक सेवा वगळता इतरांवर बंदी कायम