परभणी- महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी छापे टाकून जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि इतर बंदी घालण्यात आलेले प्लास्टिक साहित्य रस्ता कामात वापरण्यात येणार आहे. सुमारे साडेदहा क्विंटल प्लास्टिक आज संबंधित ठेकेदाराला देण्यात आले आहे. परभणी शहरातील रस्त्यांच्या कामात प्रथमच प्लास्टिकचा वापर केला जात असल्याची माहिती आयुक्त रमेश पवार यांनी दिली.
जप्त केलेल्या प्लास्टीकचा वापर रस्त्यासाठी; मनपा आयुक्तांची माहिती
छापे टाकून जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि इतर बंदी घालण्यात आलेले प्लास्टिक साहित्य रस्ता कामात वापरण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक आणि इतर साहित्यावर कारवाई करण्याची मोहीम परभणी महापालिकेने गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे. यासाठी विशेष पथक नेमून चोरून विकली विकल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आणि इतर बंदी असलेल्या प्लास्टिकच्या साहित्यावर छापे टाकण्यात येत आहेत. या छापेमध्ये महापालिकेकडे तब्बल १० क्विंटल ५० किलो प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोल आणि इतर प्लास्टिक जमा झाले आहे. हे सर्व साहित्य महापालिकेच्या कल्याण मंडप या मंगल कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
जप्त करण्यात आलेला प्लास्टिकचा सदुपयोग करण्यासाठी शहरातील कल्याण मंडप ते हडको या रस्त्याच्या कामासाठी केला जाणार आहे. या रस्त्यावर होणाऱ्या डांबरीकरनात हे प्लास्टिक मिसळण्यात येणार असून यामुळे रस्त्याची मजबुती वाढणार आहे. यामुळे पावसाळ्यात रस्त्यात मुरणाऱ्यापाण्याला आळा बसणार आहे. या कामासाठी हे प्लास्टिक आज संबंधित रस्त्याचे गुत्तेदार पल्लवी कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त रमेश पवार यांनी दिली. दरम्यान, यावेळी प्लास्टिक कॅरीबॅग विरोधी पथकप्रमुख करण गायकवाड, विनय ठाकूर इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.