परभणी- सध्या राष्ट्रवादीच्या लोकांना ईडी, सीबीआय, बँक कर्ज आणि कारखाने या 4 गोष्टींची भीती दाखवून भाजप पक्षामध्ये नेत आहे. त्याचवेळी भाजप त्यांना कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री पद देऊ, असे सांगत आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे 20-25 नेते मंत्री आणि पालकमंत्री बनणार असतील, तर सत्ता कोणाचीही आली तरी सरकार आमचेच असणार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज परभणीत केले.
हेही वाचा - रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, अवधूत तटकरे आज बांधणार शिवबंधन
संवाद यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या महाराष्ट्र दौर्यावर फिरत आहेत. याअंतर्गत त्यांनी आज (सोमवारी) हिंगोली आणि वसमत येथे संवाद कार्यक्रम आटोपून सायंकाळी परभणीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी, राजेश विटेकर, सोनाली देशमुख, भावना नखाते, प्रा. किरण सोनटक्के आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे मंदीची लाट आली आहे. जीएसटी, नोटाबंदी हेच मंदीचे प्रमुख कारण आहे. याबाबत देशाचे माजी पंतप्रधान तथा अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग हे त्या वेळी सांगत होते. परंतु, कोणाला त्यावर विश्वास बसत नव्हता. मात्र, आज त्या धोरणांचा फटका बसत असताना सर्वांना मनमोहन सिंग यांची गोष्ट पटू लागली आहे.