महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतमाल प्रक्रियेवर उद्योगाची राज्याला आवश्यकता; 'वेबिनार'मध्ये उद्योगमंत्री देसाईंचे प्रतिपादन - subhash desai parbhani agricultural university

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सोमवारी “डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे कृषी प्रक्रिया उद्योग: उद्योजकांच्या यशोगाथा” या विषयावर एक आठवड्याच्या ऑनलाईन वेबिनारची सुरुवात झाली. उद्योगमंत्री देसाई यांनी या उपक्रमाचे उदघाटन केले.

agricultural webinar
शेतमाल प्रक्रियेवर उद्योगाची राज्याला आवश्यकता; 'वेबिनार'मध्ये उद्योगमंत्री देसाईंचे प्रतिपादन

By

Published : Jul 28, 2020, 5:13 PM IST

परभणी - भारत हा कृषी प्रधान देश असला तरी देशाच्या सकल राष्‍ट्रीय उत्‍पन्‍नात शेतीचा केवळ १७ टक्के वाटा आहे. आज मोठ्या प्रमाणात शेतमाल उत्‍पादन होते. परंतु ३० ते ४० टक्के धान्याची नासाडी होऊन वाया जाते. याकरिता शेतमालावर प्रक्रिया व मुल्‍यवर्धन करणे गरजेचे आहे. त्‍यामुळे शेतमालाची नासाडी न होता, शेतकऱ्यांनाही आर्थिक लाभ होईल. शेतमाल प्रक्रिया केला तरच शेतीला भविष्‍य आहे, असे प्रतिपादन राज्‍याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सोमवारी “डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे कृषी प्रक्रिया उद्योग: उद्योजकांच्या यशोगाथा” या विषयावर एक आठवड्याच्या ऑनलाईन वेबिनारची सुरुवात झाली. उद्योगमंत्री देसाई यांनी या उपक्रमाचे उदघाटन केले. भारतीय अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि जागतिक बँक पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), नवी दिल्ली येथील अखिल भारतीय अन्नप्रक्रिया उद्योजक संघटना आणि मुंबई येथील फार्म टु फोर्क सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने “डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे कृषि प्रक्रिया उद्योग : उद्योजकांच्या यशोगाथा” या वेबिनार घेण्यात येत आहे.

वेबिनारचे आयोजन 27 ते 31 जुलै दरम्यान करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण होते, विशेष अतिथी म्‍हणुन पुणे येथील कृषी विपणन (महाराष्‍ट्र राज्‍य) संचालक सतीश सोनी व नाशिक येथील सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे उपस्थित होते. तर नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय संचालक डॉ.आर.सी. अग्रवाल, शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले, नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ. प्रभात कुमार, प्राचार्य डॉ.अरविंद सावते आदींची उपस्थिती होती.

उद्योगमंत्री देसाई पुढे म्‍हणाले, कृषी प्रक्रिया उद्योगाच्‍या विकासासाठी शासनाने अनेक धोरणात्‍मक निर्णय घेतले. शासकीय योजनाचा कृषीच्‍या विद्यार्थ्‍यींनी कृषी प्रक्रिया उद्योग उभारून लाभ घ्‍यावा. यात कृषी विद्यापीठांची महत्वाची भूमीका राहणार आहे. विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे स्नातक विद्यार्थी यांना शेतमाल प्रक्रिया उद्योजक होण्‍यासाठी प्रेरित करावे. देशात होणारा शेतीमालाची नासाडी कमी करण्‍यासाठी अद्यावत पुरवठा साखळी तथा मुल्यवर्धनासाठी संशोधन करावे. जिल्हातंर्गत असलेल्‍या औद्योगिक वसाहातीत शेतमाल प्रक्रिया व मुल्यवर्धन उद्योगासाठी भुखंड राखीव ठेऊन सदरील उद्योगांना प्राधान्य देण्यात येत असून, उद्योग विकासाकरिता उद्योगमित्र पुरविण्याचे आश्वासनही त्‍यांनी दिले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू ढवण म्‍हणाले, शेतमाल प्रक्रिया उद्योगात अनेक विद्यार्थ्‍यी कार्यरत असून, ते ग्रामीण युवकांसाठी दिपस्‍तंभाचे कार्य करित आहेत. कृषी प्रक्रिया उद्योगात येणाऱ्या समस्‍या व त्‍यावर उपाय, यावर या यशस्‍वी उद्योजकांचे मार्गदर्शन नवउद्योजकांना मोलाचे आहे. या वेबिनारच्‍या माध्‍यमातून निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.

नाशिक येथील सह्याद्री फार्मसचे व्‍यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी शेतकऱ्यांना स्‍वत:चा उत्पादीत शेत मालाची विक्री मुल्‍यवर्धन करून तथा ब्रँडींग करण्यासाठी स्वत:पासूनच प्रयत्न करण्‍याचा सल्‍ला ‍दिला. तसेच कृषी विक्री व्यवस्थापन (महाराष्ट्र राज्य, पुणे) व्यवस्थापकीय संचालक सतिश सोनी यांनी महाराष्ट्र पणन महामंडळात असणाऱ्या विविध शासकीय धोरण तथा योजना याबद्दल मार्गदर्शन केले. शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविकात आयोजन सचिव प्रा. डॉ. राजेश क्षीरसागर यांनी ऑनलाईन वेबीनार आयोजित करण्यामागची भूमीका याबद्दल माहिती दिली. नाहेप प्रकल्प प्रमुख अन्वेषक प्रा. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन प्रा. डॉ. अनुप्रिता जोशी यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. शाम गरुड यांनी मानले.

वेबीनारसाठी सुमारे दोन हजारपेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींनी ऑनलाईन नोंदणी केली. त्यामध्ये ५० टक्के कृषीचे विद्यार्थी, ३० टक्के शेतकरी बांधव, २० टक्के महिला बचत गट सदस्य, १५ टक्के उद्योजकांचा सहभाग आहे. वेबिनारचे मुख्‍य आयोजक अखिल भारतीय अन्‍न प्रक्रिया उद्योजक संघटनाच्‍या पश्चिम विभागाचे अध्‍यक्ष डॉ. प्रबोध हळदे, मुंबई येथील फार्म टु फोर्क सोल्‍युशनचे संचालक उमेश कांबळे, नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वषेक डॉ.गोपाल शिंदे आहेत. सदरिल वेबिनारचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या युटयुब चॅनेल होणार आहे. वेबीनारच्‍या समारोपीय समारंभ अन्‍न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त डॉ.अरूण उन्‍हाळे यांच्‍या प्रमुख उपस्थिती पार पडणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या वेबीनारमध्‍ये देशातील कृषी प्रक्रिया क्षेत्रातील अग्रगण्‍य अशा उद्योगांचे प्रमुख तथा संचालक मार्गदर्शन करणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details