परभणी - राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सात आगारांतून आज शुक्रवारपासून जिल्हातंर्गत बसेस धावणार आहेत. या पार्श्वभूमीवर महामंडळाने या बसेसचा तात्पुरता आराखडा तयार केला आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका असनावर एकच प्रवासी बसवण्यात येणार असून, संपूर्ण बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येऊन बसमधील सर्व प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 22 मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि तेव्हापासून महाराष्ट्राची वाहिनी असलेल्या लालपरीचे चाके देखील थांबली होती. मात्र, त्यानंतर पहिल्यांदाच प्रवासी वाहतुकीसाठी ही लालपरी लॉकडाऊनचे सर्व नियम व अटी पाळून धावणार आहे. आज शुक्रवारपासून परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील सात आगारांमधून धावणाऱ्या बसेसचे तात्पुरत्या स्वरुपातील नियोजन महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
यामध्ये परभणी आगारातून परभणी-सेलू मार्गावर 16 फेऱया होणार आहेत. तर परभणी-पालम 18, परभणी-लोहरा 12 फे-या, परभणी-कुंभारी 12 अशा एकूण 70 फेऱया होणार असून या बसेस एकूण 2 हजार 288 किमी धावणार आहे. या प्रमाणेच जिंतूर आगारातून जिंतूर-परभणीच्या ये-जा करणाऱ्या 20 फेऱ्या तर जिंतूर-सेलू मार्गावर 16 अशा एकूण 36 फेऱ्यातून बस 1 हजार 616 किमी धावेल. गंगाखेड आगारातून गंगाखेड-परभणी 20, गंगाखेड-सोनपेठ 16, गंगाखेड-पालम 16 व गंगाखेड-राणीसावरगाव 16 अशा एकूण 68 फेऱया होतील.
पाथरी आगारातून पाथरी-परभणी 20, पाथरी-सेलू 32, पाथरी-सोनपेठ 10 अशा एकूण 62 फेऱ्यांमध्ये 2 हजार 28 किमीचे अंतर बस कापणार आहे. या शिवाय हिंगोली जिल्ह्यातही हिंगोली आगारातून हिंगोलीहुन औंढा, सेनगाव, वसमत अशा एकूण 54 फेऱ्या तर वसमत आगारातून वसमत-औंढा, वसमत-बाळापूर, वसमत-वारंगा अशा 36 फेऱया होतील. तर कळमनुरी आगारातून कळमनुरी-बोल्डा, कळमनुरी-हिंगोली व कळमनुरी-वारंगा या मार्गावर 36 फेऱया होणार आहेत.