परभणी- एखादा शिक्षक काय करू शकतो, याचे उत्तम उदाहरण असलेला चित्रपट म्हणजे ‘सुपर थर्टी.’ नुकताच या चित्रपटाचा खास शिक्षकांसाठी आयोजित केलेला शो पार पडला. या प्रकारच्या राज्यातील पहिल्याच प्रयोगाला परभणीतील शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या सेलूत भरभरून प्रतिसाद मिळाला. गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांच्या कामाचा सन्मान करत त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी सेलू येथे हा विशेष शो ठेवण्यात आला होता. संबंधित उपक्रम भाजपच्या युवा नेत्या मेघना बोर्डीकर यांच्या दिपस्तंभ प्रतिष्ठाण मार्फत राबविण्यात आला.
परभणीच्या सेलूमध्ये शिक्षकांसाठी ‘सुपर थर्टी’चे आयोजन; मेघना बोर्डीकरांचा उपक्रम
गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांच्या कामाचा सन्मान करत त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी सेलू येथे 'सुपर थर्टी' या चित्रपटाचा विशेष शो ठेवण्यात आला होता.
या निमित्ताने सेलूमधील मिनाक्षी चित्रपटगृहात सेलू-जिंतूर तालुक्यातील गुरूजनांचा मेळावाच पाहायला मिळाला. शिक्षकांनी संपूर्ण भरलेले सिनेमागृह आणि प्रतिकात्मक शिक्षक आनंदकुमार यांच्या प्रयत्नांवर होणारा टाळ्यांचा कडकडाट शिक्षकांना मिळालेल्या ऊर्मीची साक्ष देत होता. दिपस्तंभ प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा मेघना बोर्डीकर स्वतः प्रवेशद्वारात शिक्षकांच्या स्वागतासाठी हजर होत्या. शिक्षकांनी योग्य परिश्रम घेतल्यास काय चमत्कार घडू शकतो, हे कळण्याच्या उद्देशाने या अनोख्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या या प्रयत्नाला शिक्षकांनी दिलेली दाद पाहून आनंद वाटला. ज्या दिवशी या प्रयत्नातून एक जरी आनंदकुमार घडेल, तो दिवस आपल्यासाठी अत्यंत समाधानाचा दिवस असेल, अशी प्रतिक्रिया मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केली. तसेच शिल्पा बर्डे, मंजुषा कोत्तावार, माधवी कौसडीकर योगेश ढवारे, मोहन कोत्तावार आदी शिक्षकांनी या उपक्रमातून प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. यावेळी शिक्षकांसोबतच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.