परभणी - शेतीची वाटणी करण्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचाच मुलाने खून केल्याची धक्कादायक घटना पालम तालुक्यातील पेन्डू येथे घडली. आज (गुरुवार) सकाळी शेतात गेलेल्या आईला हा प्रकार दिसला. त्यानंतर आईच्या फिर्यादीवरून पालम पोलिसांनी आरोपी मुलास अटक करून गजाआड केले आहे.
शेताच्या वाटणीसाठी जन्मदात्या पित्याचा केला खून; परभणीच्या पालम तालुक्यातील घटना - परभणीच्या पालम तालुक्यातील घटना
शेताची वाटणी करण्याच्या मुद्द्यावरुन मुलाने बापाचा खून केल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे. आईच्या फिर्यादीवरून पालम पोलिसांनी आरोपी मुलास अटक करून गजाआड केले आहे.
रामराव शेषराव धूळगुंडे (६० वर्ष ) असे मृताचे नाव आहे. पेन्डू शिवारात धूळगुंडे परिवारला ९ एकर शेती असून रामराव धूळगुंडे यांना ३ मुले आहेत. या तिघांना ६ एकर शेती वाटणी करून गावानजीकची ३ एकर शेती त्यांनी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी ठेवली होती. या शेतातील हिस्सा मला विकायचा आहे, तो वाटून द्या म्हणून आरोपी उत्तम रामराव धूळगुंडे (३२ वर्ष ) याने तगादा लावला होता; मात्र तो व्यसनी असल्याने त्याचे कुटुंब गावात न राहता पत्नी मुलासह माहेरी राहते. दरम्यान, शेत नावाने करून दिल्यास मुलगा ते विकून टाकेल, या भीती पोटी आई-वडिलांनी वाटणी करण्यास नकार दिला होता; मात्र याचाच राग मनात धरून उत्तम धूळगुंडे हा आई-वडिलांना दारू पिऊन नेहमी माराहाण करीत होता.
दरम्यान, काल बुधवारी रात्री शेतात काम करुन थकलेले रामराव धूळगुंडे आखाड्यावर झोपले होते. त्याचवेळी आरोपी मुलाने लाकडाने माराहाण करून त्यांचा खून केला. मृत रामराव यांची पत्नी हारिबाई धूळगुंडे या आज सकाळच्या सुमारास शेतात गेल्या असता रामराव याचा मृतदेह बाजेवर दिसला. बाजूच्या खोलीत आरोपी मुलाला पाहून त्यांनी घात झाल्याचा टाहो फोडून गाव गाठले व गावकऱ्यांना घेऊन घटनास्थळ गाठले. हरिबाई रामराव धूळगुंडे यांच्या फिर्यादीवरून उत्तम रामराव धूळगुंडे यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पालम पोलिसांनी अटक केली असून, तपास पोलीस निरीक्षक सुनील माने, जमादार नामदेव राठोड करत आहेत.