परभणी- सुमारे ३० वर्षांपासून परभणी लोकसभेवर एकहाती सत्ता मिळवणाऱ्या शिवसेनेला यावेळी देखील आपला झेंडा कायम ठेवण्यात यश आले. विद्यमान खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांना ४२ हजार १९९ मतांनी धूळ चारत विजय संपादन केला.
परभणीत शिवसेनेची विजयी रॅली विजयानंतर शिवसैनिकांनी मतदान मोजणी केंद्रावर जल्लोष केला. दुपारी ४ वाजता मताधिकाराचा कौल येताच शिवसेनेच्यावतीने जल्लोष रॅलीची तयारी करण्यात आली. त्यानुसार संध्याकाळी ६ वाजता वसमत रोड वरुन शिवसेनेची ही रॅली स्टेशन रोडमार्गे शिवाजी चौकात रात्री १० वाजता पोहोचली. रॅलीत डीजेच्या तालावर तरुणाई तसेच शिवसैनिकांनी ठेका धरला होता. यामध्ये खासदार संजय जाधव यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, भाजपचे गणेशराव रोकडे, समीर दुधगावकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
परभणी लोकसभेच्या बाबतीत जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय विजय होणार असल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र, ६ वेळेप्रमाणे यावेळेसही परभणीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेनेचे मताधिक्य घटले असले तरी अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेने एकूण १२ लाख ५२ हजार ७८२ मतांपैकी ५ लाख ३८ हजार ९४१ मते मिळवली. तर, दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांनी ४ लाख ९६ हजार ७४२ मते मिळाली. तिसर्या क्रमांकावरचे वंचित बहुजन आघाडीची आलमगीर खान यांना १ लाख ४९ हजार ८३४ मते मिळाली. चौथ्या क्रमांकावरील भाकपचे राजन क्षीरसागर यांना १७ हजार ९५ मते मिळाली आहेत.
'एक निकाल आपली हिम्मत हरवु शकत नाही - राजेश विटेकर'
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने उमेदवारी दिली. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला. हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता. पराभवाने खचून न जाता कायम पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या साथीने सर्वसामान्यांसाठी झगडत राहील. आणि एक निकाल आपल्या हिम्मतीला हरवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार राजेश विटेकर यांनी दिली.