परभणी- ज्या गड-किल्ल्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचा आणि त्यागाचा इतिहास आहे, त्या ठिकाणी आता 'छमछम' ची व्यवस्था हे सरकार करणार आहे, असे टीकास्त्र आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपवर सोडले. तसेच इतिहासातील या गौरवशाली स्थानांची बेईज्जती करणाऱ्यांच्या हातात सत्ता जावू देणार नाही, असा निर्धार देखील आज परभणीत शरद पवार यांनी केला.
परभणीत शहरातील वसमत रोडवरील कृष्णा गार्डन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार तथा जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी, आमदार विजय भांबळे यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो इतिहास घडवला, त्याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, भाजप सरकारने इतिहासातील गौरवशाली किल्ल्यांमध्ये पर्यटनासाठी व्यवस्था करण्याचा घाट घातला आहे. या ठिकाणी ते बार काढणार आहेत, इतर सुविधा देणार आहेत.
याशिवाय भाजप सरकारने शेतकऱ्यांची केलेली अवहेलना, पीकविमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या बाबतही सरकारवर टीका केली. याशिवाय त्यांनी आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मिळवून दिलेल्या सरसकट कर्जमाफीचा देखील पुनरुच्चार केला. तसेच त्यांनी १९८० साली त्यांना ६० पैकी ५२ आमदारांनी सोडून दिले होते, त्या आमदारांना आपण मात्र पुन्हा निवडून येऊ दिले नाही, हे सांगतानाच त्यांनी आता पक्ष सोडून जाणाऱ्यांना एकप्रकारे इशारा दिला आहे.
तत्पूर्वी, आमदार बाबाजानी दुर्रानी, विजय भांबळे, मधुसूदन केंद्रे, फौजिया खान यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या खास शैलीत भाजप सरकारचा समाचार घेतला.