परभणी -पूर्णा शहरातील विजय नगरात राहणारे एक कुटुंब घरात नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरातील सुमारे 3 लाख 34 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक नेऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु अजून कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही.
पूर्णा शहरात घरफोडी, चोरट्यांकडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास - पोलिसात तक्रार
परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून एका घरातील सुमारे 3 लाख 34 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. कुटुंबातील सर्व सदस्य बाहेर गेले असताना ही चोरी झाली आहे.
विजय नगरात राहणारे शेख नौशाद अहेमद कुरेशी हे शहराजवळ असलेल्या एका कारखान्यात कामाला आहेत. नेहमीप्रमाणे ते रविवारी कारखान्यावर कामासाठी गेले होते. सायंकाळी घरी येऊन जेवण केल्यानंतर ते परत कारखान्यावर कामानिमित्त गेले. रात्री पाऊस पडत असल्याने ते एका ठिकाणी मुक्कामी थांबले. त्यांची पत्नीही माहेरी गेली होती, तर मुलगा परीक्षेनिमित्त नातेवाईकांकडे थांबला होता. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराचे मुख्य द्वाराचे कुलूप तोडून आतील दरवाजाचेही कुलूप तोडले. घरातील बेडरूम मध्ये असलेल्या कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख 34 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
सोमवारी सकाळी घरी परतलेल्या त्यांच्या मुलाला घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यानंतर घरातील सामान तसेच कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिल्याचेही दिसले. त्याने तात्काळ वडिलांना सर्व घटना कळल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी ठसे तज्ञांच्या सहाय्याने चोरट्यांचा सुगावा लागतो का, याचा तपास केला. शिवाय श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. परंतु, दिवसभरात कुठलाही ठोस सुगावा पोलिसांच्या हाती लागला नसून या चोरट्यांचा तपास करण्याचे आव्हान सध्या पोलिसांपुढे आहे.