परभणी - नांदेड विभागातील परभणीमार्गे धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ४ रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लग्नसराईच्या काळात प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
परळी रेल्वे स्थानकाजवळ दक्षिण-मध्य रेल्वे विभागाने नॉन-इंटर लॉक वर्किंगच्या कामाकरिता 3 दिवस ट्राफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परभणीमार्गे धावणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
पूर्णा ते परळी (गाडी क्र. 51522) ही सवारी गाडी 8, 9 आणि 10 मे रोजी तर परळी ते पूर्णा (गाडी क्र. 51521) ही सवारी गाडी देखील 8, 9 आणि 10 मे रोजी रद्द करण्यात आली आहे. या शिवाय काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये आदिलाबाद ते परळी (गाडी क्र. 57554) ही सवारी गाडी 8, 9 आणि 10 मे रोजी परभणी ते परळी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तर परळी ते आदिलाबाद (गाडी क्र. 57553) ही सवारी गाडी 9 आणि 10 मे रोजी परळी ते परभणी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तसेच परळी ते अकोला (गाडी क्र. 57540) ही सवारी गाडी 8, 9 आणि 10 मे रोजी परळी ते परभणी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. अकोला ते परळी (गाडी क्र. 57539) ही सवारी गाडी देखील 8 आणि 9 मे रोजी परभणी ते परळी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी दिली. दरम्यान, प्रवाशांना होणाऱ्या असुविधेबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.