परभणी- लोकसभा मतदार संघात कोण बाजी मारणार ? याबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्य़ात येत आहेत. एक्झिट पोल जाहीर झाले असले, तरी परभणीत मात्र राजकीय विश्लेषक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. तीस वर्षांपासूनची शिवसेनेची सत्ता पुन्हा स्थापित होते का ? की, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस खिंडार पाडते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या निकालात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
परभणीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या लढाईत 'वंचित'ची भूमिका ठरणार महत्त्वाची - राजकीय विश्लेषक
परभणी जिल्ह्यात शिवसेनेने मागील लोकसभा निवडणुकीत सत्ता संपादन केली होती. मात्र गेल्या पाच वर्षाच्या कामाचा फटका या निवडणुकीत शिवसेनेला बसणार असल्याचे बोलले जात आहे.
परभणी लोकसभा मतदार संघात शिवसेना राष्ट्रवादीसह एकूण 17 उमेदवार नशीब आजमावत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सेना-भाजपमध्ये खरी लढत होत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय होणार असल्याचे बहुतांश एक्झिट पोलमधून पुढे आले आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची भूमिका निर्णायक ठरणार आहे. याशिवाय भारतीय कम्युनिस्ट पक्ष देखील याठिकाणी ताकदीने उतरला होता. त्यामुळे त्यांच्या पारड्यात बऱ्यापैकी मत पडणार आहेत. असे असले, तरी प्रत्यक्षात निकाल काय लागेल, याबाबत कमालीचा गोंधळ निर्माण झालेला आहे. नागरिकांमधून विजयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. एवढेच नव्हे तर राजकीय विश्लेषक देखील गोंधळलेले आहेत.
दरम्यान, शिवसेनेला गेल्या पाच वर्षातील कारभाराचा फटका बसतो का लाभ होतो, हे सांगणे कठीण आहे. परंतु वैयक्तिक पातळीवर असलेल्या नाराजीमुळे शिवसेनेच्या विरोधात प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोऱ्या पाटीचा असला, तरी मतदार त्याला किती साथ देतात, हे सांगणे अवघड आहे. एकूणच राजकीय विश्लेषकांची मते जाणून घेतली असता, त्यांच्याकडूनही संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.