परभणी- जिल्ह्यात आज गुरुवारी संध्याकाळी होणाऱ्या गणपती विसर्जनाच्या अनुषंगाने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह राखीव दल, अर्धसैनिक बल आणि तब्बल अडीच हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा लावण्यात आला आहे.
हेही वाचा-परभणी कृषी विद्यापीठाने दिलेली केळीची रोपे दोन महिन्यातच करपली; शेतकऱ्यांना मोठा फटका!
गेल्या दहा दिवसांपासून गणेश महोत्सव सुरू असून, गुरुवारी श्रींच्या विसर्जनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे. या महोत्सवादरम्यान पोलिसांनी प्रचंड असा तगडा बंदोबस्त ठेवला होता. शिवाय अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करुन महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मोलाची कामगिरी केली होती. आज संध्याकाळी श्रींच्या विसर्जन मिरवणुकीने महोत्सवाची सांगता होणार असून, यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक कृष्णकान्त उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक आर.रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, २ प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी, २० पोलीस निरीक्षक, ११५ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १५५० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी, ८०० होमगार्ड्स असा तगडा पोलीस बंदोबस्त आहे. तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथक, दहशदवाद विरोधी पथक, अवैध धंद्यावरील कार्यवाहीकरिता इतर पथके स्थापना केली आहेत.
दरम्यान, संबंधीत पोलीस स्टेशन व उपविभागात उपलब्ध मनुष्यबळासह सेलु, वालूर आणि परभणी शहरात पोलिसांचे पथसंचलन झाले. विसर्जन ठिकाणी जिल्हा प्रशासनाचे समन्वयाने पोहणारे स्वयंसेवक व पोलीस स्टाफ नेमण्यात आला आहे. गणेश विसर्जन शांततेत होण्याच्या दृष्टीने सर्वोतोपरी उपाययोजना आखण्यात आली आहे. कोणत्याही अनुचीत प्रकाराबाबत काही माहिती मिळुन आल्यास तात्काळ संबंधीत पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.