खून प्रकरणात बडतर्फ पोलिसाला मदत केल्याप्रकरणी पोलीस नाईक निलंबित - परभणी पोलीस
विमा मिळवण्यासाठी दोन खून करणाऱ्या परभणीतील एका बडतर्फ तसेच अटकेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला मदत करणे अन्य एका कर्मचाऱ्याला चांगलेच भोवले. या प्रकरणात पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या या कर्मचार्याला निलंबित केले.
परभणी - विमा मिळवण्यासाठी दोन खून करणाऱ्या परभणीतील एका बडतर्फ तसेच अटकेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला मदत करणे अन्य एका कर्मचाऱ्याला चांगलेच भोवले. या प्रकरणात पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या या कर्मचार्याला निलंबित केले. त्यामुळे पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. खुनाच्या प्रकरणात अटकेत असलेला बडतर्फ पोलीस नाईक संतोष जाधव यांच्या आग्रहास्तव एका महिलेचा मिसिंग तपास बंद करून नानलपेठ पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस नाईक दिलीप मुंडे यांनी संतोष जाधव याला मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
असे होते प्रकरण -
पोलीस नाईक दिलीप मुंडे हे सध्या दैठणा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मात्र, 2019 साली नानलपेठ पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना त्यांच्याकडे एका महिलेच्या मिसिंगचा तपास आला होता. या तपासात मुंडे यांनी हलगर्जीपणा केला. मिसिंग महिलेच्या शोधपत्रिकेत आवश्यक बाबी समाविष्ट केल्या नाही. तपास करत असताना महिला ज्या भागात राहत होती, तेथे इतर व्यक्तींकडे चौकशी केली नाही. तसेच या दरम्यान तक्रारदाराने 'सदर महिला ही मुलाबाळांसह मिळून आली असून सध्या ती हैदराबाद येथे आहे. माझी कोणाविरुद्ध तक्रार नाही', असे सांगितल्यावर पोलीस नाईक मुंडे यांनी हे प्रकरण निकाली काढले. मात्र या कारवाईत त्यांनी मिसिंग महिलेला पोलिस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर करून महिलेचा जबाब घेणे गरजेचे होते. परंतु अशी कुठलीही प्रक्रिया त्यांनी केली नाही. याच दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद असलेल्या बडतर्फ पोलिस कर्मचारी संतोष जाधव यांच्या आग्रहास्तव सदर प्रकरण बंद करण्यात आले. कर्तव्यावर असताना बेजबाबदारपणाची कृती केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षकांच्या आदेशात म्हटले आहे.
दोन खून केल्याप्रकरणी संतोष जाधव आहे अटकेत -
दरम्यान, विम्याचा लाभ मिळवण्यासाठी तत्कालीन पोलीस नाईक संतोष जाधव याने दोन खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात तो बडतर्फ असून सध्या कारागृहात आहे. परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या महिलेच्या खून प्रकरणात महिलेच्या नावे असलेला विमा वारस म्हणून मिळविण्यासाठी त्याने तिच्या अपघाताचा बनाव केला होता. या प्रमाणेच 2 नोव्हेंबर 2019 रोजी देखील त्याने सेलू येथील सहकाऱ्याच्या मदतीने मानवत रस्त्यावर एका वाहनाच्या धडकेत प्रकाश गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचा बनाव करून गायकवाड यांच्या नावे असलेला विमा वारस म्हणून स्वतः उचलण्याचा प्रयत्न केला. हे देखील प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणले. या दोन्ही प्रकरणात संतोष जाधव सध्या अटकेत आहे, आणि त्यालाच मदत करणे, पोलीस नाईक दिलीप मुंडे यांना चांगलेच भोवले.