महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फिल्मी स्टाईल हत्येचा कट उधळला.... कायद्याच्या परिक्षार्थी कैद्याचा वाचवला जीव - परभणी पोलीस

विधी शाखेच्या परीक्षेसाठी कारागृहाबाहेर जामिनावर आलेल्या एका आरोपीचा खून करण्याचा डाव शहर पोलिसांनी उधळून लावला आहे. संबंधित डाव रचणाऱ्या चार जणांना पोलिसांच्या संयुक्त पथकाने एक रिव्हॉल्वर, एक पिस्टल आणि काही काडतुसांसह ताब्यात घेतले आहे.

police arrested gangsters in parbhani
परभणी पोलिसांनी खूनाचा डाव उधळला; पिस्टल, रिव्हॉल्व्हर आणि काडतुसांसह आरोपी ताब्यात

By

Published : Jan 2, 2020, 11:31 PM IST

Updated : Jan 3, 2020, 4:47 PM IST

परभणी - विधी शाखेच्या परीक्षेसाठी कारागृहाबाहेर जामिनावर आलेल्या एका आरोपीचा खून करण्याचा डाव शहर पोलिसांनी उधळून लावला आहे. संबंधित डाव रचणाऱ्या चार जणांना पोलिसांच्या संयुक्त पथकाने एक रिव्हॉल्वर, एक पिस्टल आणि काही काडतुसांसह ताब्यात घेतले आहे. या चौघांसह इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कटासंदर्भात 26 डिसेंबरला स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमी मिळाली होती.

महानगरपालिकेचे तत्कालीन नगरसेवक अमरदिप रोडे यांचा काही महिन्यांपूर्वी रवी गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी खून केला होता. या गुन्ह्यात कारागृहात असलेला रवी गायकवाड सध्या जामिनावर बाहेर आला आहे. त्याची 27 डिसेंबरपासून शिवाजी विधी महाविद्यालय येथे एल.एल.बी. ची परीक्षा सुरू आहे. रवीचा परीक्षा केंद्रावरच खून करण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक नवा मोंढा, नानलपेठ आणि कोतवाली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी संशयितांच्या हालचालींवर साध्या वेषात पाळत ठेवली.

हेही वाचा -तिवरे धरण फुटीच्या चौकशीचा अहवाल पंधरा दिवसात सादर करा; मंत्री उदय सामंतांचा आदेश

घटनाक्रम -

काल बुधवारी 1 जानेवारीला दुपारी एकच्या दरम्यान विधी महाविद्यालयाचा कायद्याचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी परीक्षा केंद्रातून बाहेर येऊ लागले. त्यावेळी पोलिसांना संशयित बो उर्फ देवेंद्र श्रीनिवास देशमुख, शेख फेरोज शेख सलीम हे विद्यार्थ्यांच्या गर्दीमध्ये दिसले. तेव्हा हे दोघे व्यंकट मुंजाजी शिंदे याच्या टोळीतील साथीदार असल्याने निश्चितच हे ते रवी गायकवाड याच्या खूनाचा कट सिध्दीस नेण्यासाठी तेथे आले असल्याची पोलिसांची खात्री झाली होती. त्यामुळे रवी गायकवाड याच्या सुरक्षा पथकाच्या काही कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला आणि ते 3 संशयितांना ताब्यात घेण्यासाठी वेगाने त्यांच्याकडे निघाले. मात्र, पोलिसांना ओळखून ते तिघेही विद्यार्थ्यांच्या घोळक्याचा सहारा घेऊन पळून गेले. मात्र, बुधवारी संध्याकाळी 8 वाजेच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार शेख फेरोज शेख सलीम, सचिन अनिलराव पवार आणि मनोज भगवानराव पंडीत हे जिंतुर रोडवरील हायटेक जिममध्ये आले असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा -'महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचायं'

त्यामुळे तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे धाव घेऊन शेख फेरोज, सचिन व मनोज पंडित या तिघांना जिममधून ताब्यात घेतले. तेव्हा फेरोज याच्याजवळ जिमची हँड बॅग मिळून आली. या बॅगेमध्ये असलेले एक काळ्या रंगाचे रिव्हॉल्व्हर आणि ६ काडतुसे तसेच एक देशी बनावटीचा गावठी कट्टा (पिस्टल) व ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. मात्र, यातील हवा असलेला आरोपी बो उर्फ देवेंद्र श्रीनिवास देशमुख हा त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती मिळाल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि नानलपेठ पोलिसांच्या पथकाने त्याच्या राहत्या घरातून कोयता आणि खंजरसह त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, खुनाचा कट रचणाऱ्या या आरोपींपैकी बो उर्फ देवेंद्र श्रीनिवास देशमुख, शेख फेरोज शेख सलीम, सचिन अनिलराव पवार आणि मनोज भगवानराव पंडीत (सर्व रा. परभणी) आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकान्त उपाध्याय, अप्पर अधीक्षक रागुसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे, सहायक पोलीस निरक्षक व्यंकटेश्वर आलेवार, दिनेश मुळे, पोलीस उपनिरिक्षक विश्वास खोले, प्रकाश कापूरे, किशोर नाईक, कर्मचारी हनुमंत जक्केवाड, सुग्रीव केंद्रे, बालासाहेब तुपसुंदरे, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, बालाजी रेड्डी, सुरेश डोंगरे, हरिश्चंद्र खुपसे, अरुण पांचाळ, किशोर चव्हाण, भगवान मुसारे, राजेश आगाशे, जमीरोद्दिन फारोकी, शिवदास धुळगुंडे, सय्यद मोईन, सय्यद मोबीन, अरुण कांबळे यांनी केली असल्याची माहिती पोलिसांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

Last Updated : Jan 3, 2020, 4:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details