परभणी - कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी येथील बस स्थानकात पुणे, मुंबई तसेच इतर मोठ्या शहरातून येणाऱ्या बसमधील प्रवाशांची तपासणी करायला आरोग्य तपासणी कक्षाची स्थापना करण्यात आली होती. विशेष म्हणजे आज (शुक्रवारी) सकाळीच हा कक्ष उघडण्यात आला होता. मात्र, दुपारनंतर हे तपासणी कक्ष अक्षरशः बेवारस स्थितीत पडले. आरोग्य विभागाने केवळ फोटो काढण्यापुरता उद्घाटनाचा कार्यक्रम उरकवला आणि या तपासणी केंद्राकडे सपशेल दुर्लक्ष केले. यामुळे प्रवांशांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तर आरोग्य आणि जिल्हा प्रशासन 'कोरोना' च्या बाबतीत किती गंभीर आहे, हेच यावरून स्पष्ट होत आहे.
संपूर्ण जगात कोरोणाच्या विषाणूंनी दहशत माजवली आहे. भारतात तसेच महाराष्ट्रात हा विषाणू जास्त प्रमाणात पसरू नये, म्हणून काळजी घेण्यात येत आहे. प्रशासकीय स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ठिकठिकाणी लोकांच्या तपासण्या होत आहेत. या आजाराचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने विमानतळ, रेल्वे स्थानक तसेच बस स्थानकात आलेल्या प्रवाशांना तपासूनच पुढे पाठविण्यात येत आहेत. यामुळेच परभणी शहरातील बस स्थानकातदेखील आरोग्य विभागाच्यावतीने तपासणी कक्ष उघडण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या आरोग्य तपासणी कक्षाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच बाजूला मोठा मंडप टाकून त्याचा गाजावाजा करण्यात आला. या कार्यक्रमाचे फोटोही काढून प्रसारमाध्यमांना पाठवण्यात आले.