परभणी - शहरातील एका तरुणाने ‘ग्रीन अर्थ, क्लीन अर्थ’ साठी ‘से नो टू सिंगल युज प्लास्टीक’ चा संदेश देत प्लास्टीक बंदीसाठी जनजागृती केली आहे. यासाठी त्याने नुकताच नेपाळ, भुतान या दोन देशासह भारतीतील नऊ राज्यात दुचाकीवरून साडेसहा हजार किलोमिटरचा प्रवास केला आहे. त्यांचे नाव शैलेश शेषराव कुलकर्णी असे आहे.
परभणीतील तरुणाचा प्लास्टिक बंदीसाठी साडेसहा हजार किमीचा दुचाकी प्रवास
शैलेश यांची रायडींग हे पॅशन आहे. या आवडीतूनच त्यांनी आपल्या मोटारसायकवर देशभर विविध कारणाने भ्रमंती केली आहे. आपल्या छंदाला त्यांनी समाजहिताची जोड दिली आणि शासनाने 2 ऑक्टोबर रोजी घातलेल्या सिंगल युज प्लास्टीवर बंदीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी देशासह विदेशात जाऊन जनजागृती केली.
2 देश, 9 राज्य आणि 6 हजार 500 किमीचा प्रवास
शैलेश यांनी ३० ऑक्टोबर रोजी या प्रवासाला सुरवात केली. तब्बल १४ दिवसानंतर ते मंगळवारी सायंकाळी नागपुर मार्गे शहरात परतले. या दरम्यान, त्यांनी महाराष्ट्रतील अनेक जिल्हे, तेलंगणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओरीसा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आदी जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयांना भेटी दिल्या. प्लास्टीकच्या वापराचे दुष्परिणाम सांगीतले आणि स्वच्छतेची शपथ दिली. त्याच बरोबर त्यांनी नेपाळ देशातील तीन जिल्हे आणि भुतान देशातील दोन जिल्ह्यांना देखील भेटी देऊन तेथही स्वच्छतेची शपथ दिली.
दरम्यान, भारत व बांगलादेशा दरम्यान असलेल्या सिमेवर वाघा सिमेवर सैनिकांसोबत प्लास्टीक बंदीबाबत चर्चा केली. त्याच बरोबर बांग्लादेशाच्या सैनिकांबरोबर देखील प्लास्टीक बंदीचा उहापोह केला. या १४ दिवसाच्या प्रवासात ते अनेक व्यक्तीं, समुहांशी जोडल्या गेले.