परभणी - शिवसेनेतील पक्षांतर्गत शत्रूंना गेल्या काही दिवसांपासून 'महाकाल' या नावाने संबोधले जात आहे. हेच 'महाकाल' आपल्या पाठीशी असल्याचा दावा अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांनी केला.
पक्षांतर्गत शत्रूंना सोबत घेऊन अपक्ष सुरेश नागरेंची रिंगणात उडी काँग्रेसच्या माध्यमातून परभणी विधानसभेसाठी तयारीत असलेल्या सुरेश नागरे यांना पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारली. परंतु, आपण पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून, 'महाकाल' देखील आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे आपण ही निवडणूक जिंकणारच, असा विश्वास नागरे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा निष्क्रिय पोलिसांच्या विरोधात परभणीतील सोनपेठ शहर कडकडीत बंद
काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघांमधील चित्र स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर परभणी विधानसभेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले सुरेश नागरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार उपस्थित होते.
परभणीतील रस्ते, नाले, पाण्याची व्यवस्था हे सर्व पाहता, परभणीला विकासाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. आपला उद्देश केवळ विकासाचा असून त्यासाठी आपण निवडणूक लढवणार आहोत.
नागरे यांचे शिवसेनेशी अंतर्गत वाद आहेत. तरिही सर्व शिवसैनिक अजूनही आपल्या पाठीशी असल्याचा दावा नागरे यांनी यावेळी केला.