महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुन्हेगारांची टोळीच केली हद्दपार; परभणीच्या पोलीस अधिक्षकांची कारवाई - gang war

गेल्या काही महिन्यात परभणी जिल्ह्यातील ५ गुन्हेगारी टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे. या शिवाय ४ गुन्हेगारी टोळ्यांविरुध्द मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Jun 14, 2019, 11:41 PM IST

परभणी - मारहाण, धमकावणे आणि इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या जिंतूर तालुक्यातील टोळीला हद्दपार करण्यात आले. परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी या संदर्भात शुक्रवारी आदेश बजावले होते. याची तत्काळ अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे.

परभणी पोलिसांची कारवाई

विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यात परभणी जिल्ह्यातील ५ गुन्हेगारी टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे. या शिवाय ४ गुन्हेगारी टोळ्यांविरुध्द मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे. तर ४ गुंडांना एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आल्याने जिल्ह्यातील टोळी गुन्हेगारीवर चांगलाच वचक निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, बोरी येथील हद्दपार करण्यात आलेल्या गुंडांमध्ये टोळीप्रमुख आकार दत्तराव चौधरी व टोळी सदस्य विलास जालिंदर चौधरी, जगदीश प्रकाश देशमुख आणि पवन विलास चौधरी (सर्व रा . बोरी) यांचा समावेश आहे. या टोळीने २०१५ पासून २०१८ पर्यंत सातत्याने गुन्हे करून टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सर्वसामान्य नागरीकांच्या मालमत्तेस धोका निर्माण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कर्मचाऱयांच्या शासकीय कामात अडथळा आणून त्यांच्यावर हल्ला करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, मारहाण, जिवे मारण्याची धमकी, घातक हत्याराने हल्ला करणे, असे ९ गंभीर गुन्हे केल्याचा आरोप आहे.

टोळीप्रमुख आकार दत्ताराव चौधरी याच्या विरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. यासाठी त्याला २०१० मध्ये तीन महिन्याकरींता जितुर तालुक्यातुन हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतरही त्याच्यावर ३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कारनाम्याला वैतागलेल्या गावकऱ्यांनी २०१८ साली चौधरी आणि त्याच्या टोळीला हद्दपार करून बोरी गावाला दहशतमुक्त करण्याची मागणी केली होती.

त्यानुसार त्यांना १२ महिन्यांसाठी परभणी जिल्ह्यातील जिंतुर, परभणी, सेलु, मानवत, पाथरी या तालुक्यातुन व हिंगोली जिल्हयातील औंढा नागनाथ, सेनगाव, वसमत तालुक्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक उपाध्याय यांनी बजावले. त्यानुसार बोरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेचार, पोलीस नाईक सुनील शिरी यांनी या टोळीला हद्दपार क्षेत्राच्या बाहेर ताडकळस येथे नेवून सोडले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details