परभणी- अनेकवेळा छापा पडण्याची पूर्वसूचना मिळत असल्याने अवैध धंदेचालक पोबारा करतात. मात्र, त्यांना पळून जाण्याची संधी मिळू नये म्हणून परभणी पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर वेषांतर करून छापा टाकला. यावेळी ६ जुगारी पकडून मोबाईल, जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली.
वेशांतरीत परभणी पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा, ६ जण ताब्यात - raid
जुगार अड्ड्यावरील धाड यशस्वी होण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनाही वेशांतर करण्यास सांगितले होते. त्यानुसार पथकामध्ये कोणी शेतकरी, ऊसतोड कामगार, व्यापारी, कीर्तनकार आणि गोंधळी असे वेशांतर केले
जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील आठवडी बाजारामध्ये मुंबई-कल्याण नावाचा जुगार उघडपणे चालत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते. जुगार अड्ड्यावरील धाड यशस्वी होण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनाही वेशांतर करण्यास सांगितले होते. त्यानुसार पथकामध्ये कोणी शेतकरी, ऊसतोड कामगार, व्यापारी, कीर्तनकार आणि गोंधळी असे वेशांतर केले.
हे वेशांतरीत पोलीस एका खासगी वाहनाने प्रवास करत कौसडी येथील आठवडी बाजारात पोहोचले. या ठिकाणी जुगार घेणाऱ्यांचा शोध घेतला. कौसडी गावातील आरोग्य केंद्रासमोर आणि मारूती मंदिरासमोर सार्वजनिक ठिकाणी या वेशांतर केलेल्या पोलिसांनी धाड टाकली. या धाडीमध्ये रमेश मोरे, तुळशीराम देशमुख, साहेबराव देशमुख, विनोद शंख, लक्ष्मण दगडु आणि गजानन यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्याकडून ३ मोबाईल आणि जुगार साहित्यासह रोख ३ हजार रुपये जप्त केले. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, बाळासाहेब तुपसमुंदे, हनुमंत जक्केवाड, लक्ष्मीकांत धुतराज, भगवान भुसारे, सय्यद मोईन, हरी खुपसे, सय्यद मोबीन यांनी कामगिरी बजावली.