परभणी - लोअर-दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडण्यास जालनेकरांनी विरोध केला आहे. त्यामुळे दूधना नदीपात्र कोरडे पडले आहे. काही दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्याला लोअर दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासकीय स्तरावर झाला आहे. परंतू, या निर्णयाला जालन्यातील काही पुढारी विरोध करू लागले आहेत. सध्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदार दुधना प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे.
परभणी जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी लोअर दुधना प्रकल्पातून परभणीसाठी पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. सोबतच पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. याप्रकरणी परभणीचे माजी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लोअर दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केला होता. त्यानुसार राज्य शासनाने विभागीय आयुक्तांना पाणी सोडण्याचे आदेशही दिले. 15 मे रोजी 15 टीएमसी पाणी परभणीला सोडण्यात येणार आहे. परंतू, त्यापूर्वीच जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेथलिया तसेच मोहन अग्रवाल या पुढाऱ्यांनी प्रकल्पातून परभणीसाठी पाणी सोडण्यास विरोध केला आहे.