परभणी - शहर महानगरपालिकेत अडीच वर्षांसाठी महापौर पदाची निवड आज शुक्रवारी होणार आहे. 65 नगरसेवक असलेल्या परभणी महापालिकेत काँग्रेसचे 30 सदस्य असून त्यांना केवळ तीन मतांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वतःचे सदस्य सहलीवर पाठवले होते. ते ऐनवेळी हजर होतील, तर काँग्रेसकडून राष्ट्रवादीचे 5 ते 6 सदस्य फोडले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा... प्रशासनाने काश्मीरवरील निर्बंधांबाबत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे - सर्वोच्च न्यायालय
परभणी महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया आज बी. रघुनाथ सभागृहात पार पडणार आहे. महापौर पद हे अनुसूचित जातीच्या महिला उमेदवाराला आरक्षित झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (18 नोव्हेंबर) महापौर पदासाठी 4 तर उपमहापौर पदासाठी 5 जणांचे उमेदवारी अर्ज आले आहेत. यामध्ये महापौर पदासाठी काँग्रेसच्या वतीने अनिता सोनकांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ. वर्षा खिल्लारे, गवळणबाई रोडे तर भाजपच्या मंगला मुद्गलकर यांचा अर्ज दाखल आहे.
हेही वाचा... ...तर भाजपातून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग - राजू शेट्टी
उपमहापौर पदासाठी काँग्रेसच्यावतीने भगवान वाघमारे व महेबुब खान तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महेबुब अली पाशा, अली खान आणि भाजपच्या मुकूंद खिल्लारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष निवड प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. सुरुवातीच्या पंधरा मिनिटात उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर निवडणूक अधिकारी मतदान घेऊन नूतन महापौर व उपमहापौरांची घोषणा करतील.