परभणी - जालन्याचा तिढा सुटतो न सुटतो तोच परभणी लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेचा तिढा वाढला आहे. भाजपच्या युवानेत्या मेघना बोर्डीकर या लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्यावर युती अंतर्गतच लढण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीत मराठवाडा समन्वयक म्हणून राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात मांडून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती खोतकर यांनी दिली.
परभणी लोकसभा मतदार संघावर भाजपच्या युवनेत्या मेघना बोर्डीकरांनी दावा केला आहे. गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या परभणी लोकसभा मतदार संघावर काही मुद्दे मांडून भाजपच्या युवनेत्या मेघना बोर्डीकरांनी दावा केला आहे. परंतु, सेनेने विद्यमान खासदार संजय जाधव यांची उमेदवारी कायम ठेवल्याचे निश्चित आहे. आज (शुक्रवारी) यावर मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर अंतिम फैसला घेणार असल्याने परभणी जिल्ह्यातील युती आणि आघाडीसह वंचित आघाडीच्या उमेदवार तसेच पदाधिकाऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मराठवाड्याचे शिवसेना समन्वयक राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बुधवारी परभणीला भेट दिली. यावेळी त्यांनी खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यासह माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह बैठक घेऊन त्यांनी खासदार जाधव व मेघना बोर्डीकर यांचा समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. बंद दाराआड एक तास चर्चा झाली. मात्र, या चर्चेची काहीच फलश्रुती झाली नसल्याचे दिसते.
माध्यमांशी बोलताना अर्जुन खोतकर यांनी सांगितले, की याविषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांसमोरच सोडवला जाईल, तेच अंतिम निर्णय घेतील. यासाठी आज (शुक्रवारी) मुंबईतील वर्षा बंगल्यावर बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याबैठकीत भाजपचे रामप्रभू मुंढे, विठ्ठलराव रबदडे, जालन्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, भास्कर आंबेकर आदींसह परभणीतील शिवसेना-भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.