महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 13, 2020, 8:28 PM IST

ETV Bharat / state

कोरोनाचा बळी गेल्याची खोटी बातमी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल - परभणी जिल्हाधिकारी

जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी म्हटले आहे.

parbhani collecter d m muglikar
परभणी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर

परभणी - जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे असताना नांदेड येथून प्रकाशित होणाऱ्या एका दैनिकाच्या ऑनलाईन पोर्टलवर पूर्णेच्या वार्ताहराने परभणीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी प्रसिद्ध केली होती. ज्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी स्वतः आदेश देऊन संबंधित वार्ताहरावर गुन्हा दाखल केला आहे. तर अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

परभणी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा...ईटीव्ही भारत विशेष : राज्यात 'अशी' होत आहे कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांची हाताळणी

परभणी जिल्ह्यातील 320 जणांची संभाव्य कोरोना रुग्ण म्हणून आरोग्य प्रशासनाने तपासणी केली. मात्र, त्यापैकी एकालाही कोरोची लागण झाली नसल्याचे स्पष्ट आहे. आज सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत परभणी जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना देखील आज सकाळी नांदेड येथून प्रकाशित होणाऱ्या एका दैनिकाच्या पूर्णा येथील वार्ताहराने परभणीत पुणे येथून आलेल्या एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची बातमी ऑनलाईन प्रकाशीत करून जिल्ह्यात खळबळ उडवून दिली होती.

त्यानंतर प्रशासनही खडबडून जागे झाले. या बातमीची शहानिशा केली असता, ती बातमी अन्य जिल्ह्यातून आलेल्या बातमीवरून कॉपी पेस्ट केली आणि नाव बदलून सदर दैनिकाच्या ऑनलाइन पोर्टलवर प्रसिद्ध केल्याचे निदर्शनास आले. मात्र, सदर वार्ताहरांनी केलेल्या या गैरप्रकारामुळे परभणी जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाची झोप उडाली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच सदर दैनिकाच्या नांदेड येथील कार्यालयाला सील लावण्याची कारवाई करावी, असे पत्र आपण नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे देखील जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सांगितले. त्यानुसार पूर्णेचे नायब तहसीलदार चंद्रकांत बिजमवार यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आपत्ती व्यवस्थापन कलम आणि इतर काही कलमांतर्गत सदर वार्ताहरावर गुन्हे दाखल झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details