परभणी- यावर्षी राज्यभरात उष्णतेची लाट आली आहे. यामुळे उष्माघातासारख्या घटनाही घडू लागल्या आहेत. सोनपेठ येथे उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आज गंगाखेड येथे एका वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
परभणीत यावर्षी तापमानाने उच्चांक गाठला आहे. काल रविवारी परभणीचे तापमान तब्बल ४७.२ अंश डिग्री सेल्सिअस एवढे होते. हे तापमान गेल्या ३० वर्षातील सर्वाधिक तापमान असल्याने शहरात उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक हवालदिल झाले आहेत. सोनपेठ येथे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा उष्माघाताने शनिवारी मृत्यू झाला होता. त्यानंतर २४ तासांतच गंगाखेड शहरात उष्माघाताचा दुसरा बळी गेला आहे.
पंढरीनाथ किशनराव कांबळे ( वय ८०, रा. माकेगाव ता.रेणापूर जि.लातुर), असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव गंगाखेड येथील टेलिफोन ऑफीस रस्त्यावर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी वृद्ध बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जमादार वसंतराव निळे, सुरेश पाटील, मुक्तार पठाण, नगरसेवक शेख कलिम, सय्यद खिजर, शेख राजू आदींनी बेशुद्धावस्थेतील वृद्धाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी हरकळ, परिचारिका विजयमाला घोबाळे, गोविंद वडजे आदींनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, उपचार सुरु असताना संध्याकाळी वृद्धाचा मृत्यू झाला. आढळून आलेल्या मतदान कार्डवरून पंढरीनाथ किशनराव कांबळे अशी त्यांची ओळख पटली आहे. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांसोबत संपर्क साधून माहिती दिली असून आज दुपारी ४ वाजता कांबळे यांचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, नातेवाईक आले नसल्याने हा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातील शवग्रहात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.