परभणी- कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना किराणा आणि भाजीपाल्यासाठी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे परभणीत जिल्हा प्रशासनाने 'पीएनबी-शॉप' हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. या माध्यमातून किराणा मालाची ऑनलाईन खरेदी करता येते. आता या ॲपवरून किराणा मालासोबतच भाजीपाल्याचीदेखील खरेदी करता येणार आहे. यासाठी नागरिकांना हे ॲप अपडेट करावे लागणार आहे.
या ॲपवर भाजीपाला नावाचा स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. सध्याच्या ॲपधारकांना ही सुविधा वापरासाठी नव्याने डाऊनलोड करावयाची आवश्यकता नसून त्यांना फक्त त्यांच्याकडील ॲप अपडेट करावे लागणार आहे. नवीन डाऊलोड करणाऱ्यांना सुधारीत आवृत्तीच उपलब्ध होईल. किराणा मालासोबतच आता परभणीच्या नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठीदेखील घराच्या बाहेर पडण्याची गरज नाही. गूगल प्ले स्टोअरवर हे ॲप विनामूल्य उपलब्ध आहे. अँड्रॉइड फोनधारक हे ॲप वापरू शकतील. संगणकावर www.pbnshop.inद्वारे ही प्रणाली वापरता येणार आहे. सदर सेवा ही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत पुरविण्यात येत आहे. या मोबाईल ॲप आणि संगणक प्रणालीची निर्मिती ई-कॉमर्स क्षेत्रातील तज्ज्ञ सचिन देशमुख यांच्यावतीने विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रणालीचा विकास केला आहे. शुक्रवारपासून ही नवीन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, याद्वारे किराणा व भाजीपाल्याची ऑर्डर दिल्यानंतर २४ तासाच्या आत घरपोच सेवा मिळणार आहे. प्रत्यक्ष बाजारपेठेतील दराप्रमाणे पावती मिळणार आहे. विशेष म्हणजे स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक ही सेवा विनामुल्य पुरवित आहेत.