महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत आज एकाच दिवशी आढळले 7 कोरोनाबाधित; रुग्णसंख्या 130 वर - परभणी कोरोना आकडेवारी बातमी

आज शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यात 7 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील 6 जण परभणी शहरातील असून इतर एकजण हा मानवतमधील आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 130 एवढी झाली आहे.

परभणीत आज एकाच दिवशी आढळले 7 कोरोनाबाधित
परभणीत आज एकाच दिवशी आढळले 7 कोरोनाबाधित

By

Published : Jul 3, 2020, 7:36 PM IST

परभणी :गेल्या आठवडाभरात मोठ्या प्रमाणात आढळून येणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांमुळे आजपासून तीन दिवसांची संचारबंदी लागू आहे. या दरम्यान आज (शुक्रवार) केवळ परभणी शहरात 6 तर मानवतमध्ये 1 असे एकूण 7 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे या 7 रुग्णांसह परभणी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 130 वर पोहोचली आहे. त्यापैकी 94 जणांना सुट्टी देण्यात आली असून, 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, उर्वरित 32 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमित कक्षात उपचार सुरू आहेत.

परभणी शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. आज शुक्रवारी सायंकाळी 6 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात परभणी शहरातील कादराबाद प्लॉट भागात 1, नाथनगरात 2, अजिजीया नगरात 1, पंचशील नगरात 1 व विकास नगरात 1 असे एकूण 6 संशयित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर मुंबई येथे स्वॅब देऊन मानवत येथे वास्तव्यास आलेल्या एका रुग्णाचा कोरोना अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता आरोग्य प्रशासनाकडून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतल्या जात आहे. त्यांच्या कुटुंबियांना होम-क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, हे सर्व परिसर सील करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येत आहे. यापैकी कादराबाद प्लॉट हा परिसर यापूर्वीच सील करण्यात आलेला आहे. तर, इतर भागांमध्ये आता निर्जंतुकीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच या भागात संचारबंदी लावण्याचे आदेश देखील जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत संशयितांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. आज प्रयोग शाळेत एकूण 48 स्वॅब प्रलंबित होते. त्या स्वॅबचे अहवाल सायंकाळी 5 च्या सुमारास मेलद्वारे प्राप्त झाले. त्यात शहरातील वरील ठिकाणच्या 6 संशयितांसह मानवतच्या एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 130 एवढी झाली आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 942 संशयित आढळले आहेत. यातील 2 हजार 638 जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण 130 कोरोनाबाधित आढळले असून यातील 4 जणांचा यापुर्वीच उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 94 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 31 कोरोनाबाधितांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक मोठी वाढ होत आहे. गुरुवारी देखील 4 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या नागरी भागात रविवारी मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तर, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग व महसूल विभागात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येने मोठी खळबळ उडाली आहे. नागरी भागात सावधगिरीच्या उपयायोजना अवलंबिल्या जात आहेत. शहरासह जिल्ह्यात अन्य महानगरातून मोठ्या प्रमाणावर व्यक्ती व कुटुंबिय अधिकृत, अनाधिकृतपणे स्थलांतरीत होत असून, त्यामुळेच जिल्हा महसूल, पोलीस प्रशासन चिंतेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details